मधुमेह : गोड नाव असलेला कडू आजार

गेल्या काही वर्षात संपूर्ण जगभरात मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे. वेळीच जनतेची जागरूकता झाली नाही तर सन 2030 पर्यंत हा आजार जगातील सर्वात मोठा आजार ठरण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. मधुमेहाविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवणं गरजेचं आहे.

आजार कुठे होतो, कसा होतो, याविषयी आपण काहीच सांगू शकत नाही. मधुमेहाला काही स्थळ आणि काळाच्या मर्यादा नाहीत. कित्येक मधुमेही रुग्णांना तर आपल्याला हा आजार आहे याविषयीही अजिबात माहिती नसते. हा यातील सर्वात मोठा धोका आहे. हा आजार असाच वाढत राहिला तर वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक पातळीवर तो अतिशय खोलवर परिणाम घडवू शकतो.

बैठं काम करण्याची जीवनशैली असलेली मंडळी, साखर, मीठ आणि चरबीयुक्त पदार्थाचं सेवन करणारी मंडळी, अशा लोकांना मधुमेहाचा धोका अधिक असतो. अतिरिक्त वजन आणि व्यायामाचा अभाव यामुळे 90 टक्के लोकांना टाइप 2 चा मधुमेह होतो. खरं म्हणजे कोणत्याही प्रकारचा मधुमेह बरा होऊ शकतो. फक्त तो लवकर समजणं गरजेचं आहे. या आजाराचं निदान लवकर झालं नाही तर तो शरीराच्या कोणत्याही मुख्य अवयवाला धोका पोहोचवू शकतो. परिणामी हृदयविकार, स्ट्रोक्‍स, अंधत्व किंवा चेतासंस्थेला इजा पोहोचू शकते. म्हणूनच हा आजार होऊच नये म्हणून आपण स्वत: काही पावलं उचलणं आवश्‍यक आहे.

मधुमेह होऊच नये किंवा मधुमेह झाल्यावर काळजी कशी घ्यायची याविषयी प्रत्येकाने जनजागृती मोहीम राबवली पाहिजे. सकस आहार आणि शर्करायुक्त पेय कटाक्षाने टाळणं आवश्‍यक आहे. तसंच आपल्या अवयवांकडेही लक्ष दिलं पाहिजे. आपण किती खायला घेतो यापेक्षा आपण खातोय ते किती पौष्टिक आहे याकडे लक्ष द्यावं. थोडक्‍यात आपण सेवन करत असलेल्या पदार्थातून आपल्या शरीराला आवश्‍यक असलेली ऊर्जा आहारातून मिळते की नाही, यावर लक्ष ठेवायला हवं. त्याचप्रमाणे दररोज 30 मिनिटं नियमित चालणं आणि आपलं वजन वाढणार नाही याकडे लक्ष देणं आवश्‍यक असतं.
रक्तात साखरेचे प्रमाण वाढले तर काय होते?

मधुमेहामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका अधिकच वाढतो. 50 टक्के मधुमेही रुग्णांच्या मृत्यूचे कारण हे हृदयविकार आणि पक्षाघात आहे. रक्तात वाढलेली साखर आणि कमी झालेला रक्तपुरवठा यामुळे चेतापेशींना इजा होते. त्यामुळे पायांची संवेदना कमी होते. जखमा झाल्यानंतर जंतुसंसर्ग वाढतच जातो आणि प्रसंगी पायदेखील कापावा लागतो. जगातील अंधत्व हे मधुमेहाच्या दृष्टिपटलावरील परिणामामुळे होते. मूत्रपिंड निकामी होऊन डायलिसिस करायला लागण्याचेदेखील महत्त्वाचे कारण मधुमेह हे आहे.

मधुमेहासाठी लागणाऱ्या उपचारांचा खर्चदेखील बराच जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतासारख्या विकसनशील देशामध्ये साधारण कुटुंबाचे जवळपास 25 टक्के उत्पन्न फक्त मधुमेहाच्या उपचारांसाठी खर्च होते. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी हे एक मोठे आव्हान आहे. या मागची कारणे कोणती? मानवाने नेहमीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे. मग ती आर्थिक, सामाजिक किंवा भौतिक असो. या धावपळीमध्ये काही अपरिहार्य बदल माणसाच्या जीवनशैलीमध्ये झाले. शारीरिक हालचालींचा अभाव, स्निग्ध आणि अतिगोड पदार्थाचे अतिरिक्त सेवन, वरचेवर वाढत चाललेला ताणतणाव, शारीरिक स्थूलता आणि वाढलेली आयुर्मर्यादा यांमुळे मधुमेहाच्या प्रमाणामध्ये अधिकच भर पडत आहे.

पहिल्या प्रकारच्या मधुमेहाची नेमकी कारणे निश्‍चित नसल्यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आव्हानात्मक आहे. पण दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा प्रतिबंधात्मक उपायांनी नियंत्रित करता येऊ शकतो. वाढत्या वजनावर नियंत्रण, नियमित योग्य व्यायाम, योग्य वेळी योग्य पोषक आहार, आरोग्यदायी दिनचर्या व निर्व्यसनी जीवनशैली यांमुळे मधुमेहापासून स्वत:चा बचाव करता येतो. मधुमेहाचं त्वरित निदान झाल्यास आणि नियमांचं काटेकोरपणे पालन केल्यास मधुमेहामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना आपण ताब्यात ठेवू शकता

मधुमेह हा आजार आणि त्यामुळे होणाऱ्या गुंतागुंतींची व्यापकता लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने उत्कृष्ट राहा; मधुमेहावर मात करा! असा संदेश दिलेला आहे. उत्कृष्ट राहा यामध्ये-मधुमेहाचा वाढता प्रभाव थांबवणे, सक्रिय राहणे, आरोग्यदायी खाणे, वैद्यकीय सल्ला पाळणे आणि जर शंका आली तर स्वत:ची तपासणी करून घेणे या सर्व बाबी समाविष्ट आहेत.

Leave a Comment