“हा’ चित्रकार घेतोय शोध वाई, पाचगणी-महाबळेश्‍वरच्या इतिहासाचा

मूळचे पाचगणीचे रहिवासी असलेले, सध्या वाई येथे मेणवलीजवळ स्थायिक झालेले आणि चित्रकलेला वाहून घेतलेले संवेदनशील दाम्पत्य म्हणजे सुनिल आणि स्वाती काळे. त्यांचा मेणवलीजवळ विस्तीर्ण जागेत स्टुडिओ आहे आणि या दोघांची चित्रं विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहेत. चित्र रेखाटनाच्या निमित्ताने निसर्गभ्रमंती करताना आणि विविध ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देताना त्यांना जाणवलेले मुक्त चिंतन त्यांनी येथे मांडले आहे. वाई-पाचगणी-महाबळेश्‍वरच्या इतिहासाचा धांडोळा घेऊन आपल्या आगामी “स्केचबुक’ या ग्रंथातून चित्रं, आठवणी आणि ऐतिहासिक नोंदी साकारण्याचा प्रकल्प ते राबवत आहेत. त्याविषयी…

मी पाचगणीच्या मराठी शाळेत शिकायला होतो. पहिली ते सातवीपर्यंत आमच्या शाळेत “चित्रकला’ हा विषय असतो हे आम्हाला माहीतही नव्हते. सातवी नंतर मी “संजीवन’ या मोठ्या शाळेत गेलो. त्यावेळी शाळेत चित्रकला विषयाला स्वतंत्र शिक्षक असतो हे समजले. मग हॉबी क्‍लासमध्ये रंग, रेषा ,आकार , क्राफ्ट यांची ओळख झाली आणि मग त्याचवेळी स्केचिंग करायचा नाद लागला. घरात एकत्र कुटुंबांतील गर्दीमुळे अभ्यासाला जागा नसायची मग “निसर्ग’ नावाचा नवा गुरू व नवा मित्र मिळाला.

या निसर्गमित्राची अनेक अवर्णनीय रूपे सतत मनाला मोहीत करायची. आजही नव्याने चकीत करत असतात. मग पेन्सिल्स, पेन, शाई, जलरंग या माध्यमातून जागेवर जाऊन असंख्य रेखाटने केली. रेखाटने करायची म्हणजे नेमके काय करायचे, हे प्रत्यक्ष जवळ बसवून कोणी शिकवले नाही. मग निसर्गालाच खरा गुरु मानला. एकलव्याप्रमाणेच त्याची अनेक रुपे सतत नवनवीन गोष्टी चित्रित करायला शिकवत होती. आपल्या डोळ्यानां, मनाला जाणवणारा जो सुखद आल्हाददायक दृष्यानुभव कुठेतरी अंतर्मनात संवेदना निर्मित करत होता. मनात झिरपत होती ती संवेदना; ती जाणीव, तो आनंद कागदावर दृष्यरूपात प्रकट करताना अमाप आनंद होत होता. कधीकधी खूप वेळा वारंवार तीच ती दृश्‍ये सातत्याने पहात असल्याने मनातच चित्रे तयार होत होती. त्यानंतर मग रेखाचित्रे अनेक बारकाव्यांसहीत टिपायची सवय लागली. पुढे कलामहाविद्यालयात गेल्यावर रेखाटनांचे महत्व कळाले. मग “स्केचबुक’ हे कोठेही बाहेर जाताना महत्वाची गोष्ट ठरली; ती आततागायत सवय मोडली नाही.

वाईच्या मंदिरांची, घाटांची, रस्त्याशेजारच्या भव्य वडांच्या झाडांची, महाबळेश्वर परिसरातील दऱ्याखोरांची, पर्वतरांगाची, पाचगणीच्या टेबललॅन्डची, आजुबाजुच्या खेड्यांमधील उंचावरून दिसणाऱ्या घरांची, भातशेतांची, प्रतापगडाच्या व जावळीच्या घनदाट जंगलाची रेखाटने भूक तहान विसरून करत राहायचा नाद जीवनातील महत्वाचा व रोजच्या जगण्याचाच भाग झाला. आणि अशी एखादी गोष्ट आपण तन, मन व धनाने स्विकारली की त्यात फायद्यातोट्याचा हिशोब करत बसायचा नसतो. त्यामधून मिळणारा आनंद पैशांतून मोजायचा नसतो हे कित्येक वर्ष मनात कायमस्वरूपी ठसले.
एकदा लॉकडाऊनच्या काळात ही अनेक छोट्यामोठ्या स्केचबुकातील सगळीकडे विखुरलेली ढिगभर स्केचेस मी एकत्र केली व मी स्तिमितच झालो आणि त्यांची संख्या मोजायचेही विसरून गेलो.

नुकताच मी नेहमीप्रमाणे सकाळी मेणवली घाटावर फिरायला गेलो होतो. अर्थात खिशात छोट्या आकाराचे स्केचबुक होतेच. मी एक निवांत जागा पकडून स्केच करत होतो. त्याचवेळी मुंबईच्या एका कॉलेजची मुलामुलींची ट्रिप घाटावर स्टाईलमध्ये “फोटू’ काढण्यात मग्न होती. त्यातला एक “जाणकार’ सर्वानां मस्त गमतीशीर माहीती सांगत होता. या मेणवलीच्या वेगवेगळ्या ठिकाणावर सर्वांना नेऊन या ठिकाणी “बोलबच्चन’ची शुटींग झाली. याठिकाणी “मृत्यूदंड’ माधुरी दिक्षितचा शॉट झाला, याठिकाणी “काकस्पशर्’ सिनेमाचा शॉट झाला, “गंगाजल’चा मारामारीचा शॉट याच ठिकाणी झाला. “स्वदेश’ सिनेमाच्या वेळी शाहरूख खान येथेच बसला होता इ.इ. माहिती अगदी बिनचुकपणे संवांदासह ऍक्‍शन करून दाखवत होता. या साऱ्या चित्रपटांच्या कथा त्या सर्वानांच तोंडपाठ होत्या.

माझे स्केच संपल्यावर मी त्यांच्या गटात सामील झालो . मग मी त्यानां विचारले हा मेणवलीचा वाडा कोणी बांधला? हा घाट, ही मंदीरे कोणी निर्माण केली? किती वर्षांपूर्वी याची निर्मिती झाली? ही नदी कोणती आहे? तिचे नाव कोणाला माहीत आहे का? असे विचारल्यावर सगळेच संभ्रमात पडले. कोणालाही काहीही माहीती नव्हती. थोडक्‍यात आपल्या इतिहासाशी वास्तूंविषयी, जागेविषयी त्यानां काही देणेघेणे नाही हे मला जाणवले. आमच्याकडे गडकिल्ले, पुरातन वास्तू व त्यावरील मिनिएचर पेंटींग्ज, स्थापत्यशास्त्र, लेणी, मंदीरे, शिल्पे, त्यांचा इतिहास, त्यांचे महत्व काळाच्या प्रवाहात वेगाने नाश होत चालले आहेत. त्यांचे जतन, डागडुजी, संवर्धन हे कोणाचेच काम नाही, या विषयांशी आपले घेणेदेणे नाही याची बऱ्यापैकी सर्वानांच आता सवय झाली आहे.

अर्थात इतरानां दोष देत बसण्यापेक्षा मी काय करू शकतो यावर माझा विचारविनिमय सुरु झाला. मग त्यातूनच एक कल्पना सुचली. मी या परिसरातील स्केचेस तर केलेली आहेतच. या रेखाटनांसोबत थोडा नवा, थोडा जुना इतिहास, माहिती आणि माझे प्रत्यक्ष चित्र रेखाटताना आलेले अनुभव यांचे मिश्रण करून एक छान पुस्तक करायचे काम सुरू केले आहे. गेल्या संपूर्ण महिन्याभरात मी सार्वजनिक वाचनालये, कॉलेजच्या लायब्ररीज, काही वयस्कर जुनी जाणती माणसे यानां प्रत्यक्ष भेटणे, काही जणांच्या व्यक्तिगत संग्रहातील माहीती पुस्तके मिळवून त्यांचे वाचन करून काही महत्वाच्या नोंदी नमुद करण्याचे काम सुरु केले आहे. त्याचा यापुढे सर्वानाच उपयोग होईल याची मला खात्री आहे.

काही नवीन स्केचेस करणे, जुनी पुस्तके, कात्रणे, जुन्या शाळांचा इमारतींचा, संस्थाचा जुना इतिहास शोधणे, नवी जुनी गाईडबुक्‍स मिळवणे, ऐतिहासिक पुरातन संदर्भ मिळवणे हे वाटते तितके सोपे काम नाही. व्यक्ति तितक्‍या प्रकृति या म्हणीप्रमाणे माणसांच्या नानाविध स्वभावांचा, जगण्याच्या वेगवेगळ्या प्रवृत्ती, टाळाटाळ करण्याची वृत्ती, नकारात्मक विचारांचा प्रभाव, आपल्याकडे साहित्य, माहिती साधी झेरॉक्‍ससाठीही उपलब्ध करून न देण्याची वृत्ती, आपल्या परिसराबद्दल गावाबद्दल असणारी उदासिनता हे देखील मी अनुभवत आहे. अर्थात काही अपवादात्मक मंडळी आदराने आपल्याकडचे सर्व ज्ञान, माहिती, पुस्तकांचे संदर्भ उदार मनाने उपलब्ध करून देत आहेत आणि त्यांचे प्रोत्साहन नेहमीच प्रेरणादायी ठरत असते. अशा भेटलेल्या व्यक्ति आणि वल्लींचे एक नवे वाचनीय पुस्तक तयार होईल असे वाटते. पण निराश न होता सकारात्मक वृत्तींची ज्योत न विझून देता प्रयत्नपूर्वक लिखाणाचे काम सुरु आहे.

पाचगणी महाबळेश्वरची जुनी पुस्तके शोधताना एका मैत्रिणीकडे दिडशे दोनशे वर्षांपूर्वीचे फ्रेंच भाषेतील छापलेले एक संदर्भ पुस्तक मिळाले. त्यामध्ये वाई, पाचगणी व महाबळेश्वरच्या पॉईंटसचे अप्रतिम ब्लॅक अँन्ड व्हाईट फोटो व जुन्या माणसांच्या वेशभूषेचे अदभूत नमुने छापलेले आहेत. 1902 व 1913 सालच्या महाबळेश्वरच्या पुस्तकात जागेचे रेटस्‌, ब्रिटिशांनी केलेला वातावरणाचा अभ्यास, त्यांचा पर्यटनस्थळ विकसित करत असतानाच्या प्रवासाच्या अडचणी, त्यावेळेचे वृक्षारोपण, त्यावेळेचे प्रत्येक महिन्याचे वातावरणातील बदल, पाण्याच्या अडचणी त्यावर केलेली उपाययोजना व अथक प्रयत्न पाहून मन थक्क होते. ही माहीती व फोटो आज 125 वर्षानंतर वाचताना, पाहताना खूप मजा व आश्‍चर्य देखील वाटते. इरिना चेलशेव्ह या रशियन महिलेने पाचगणीवरचे निसर्ग अनुभवल्या नंतरचे नितांत प्रेम “ब्लू माऊंटन्स ऑफ पंचगणी’ या इंग्रजी पुस्तक रुपात अजरामर केले. माझी दोन चित्रे तिने नेहरू सेंटरच्या कलादालनात विकत घेऊन चित्ररुपाने या अजरामर स्मृती तिच्या घरात व पुस्तकरुपाने माझ्या मनात कायमच्या जतन केल्या आहेत. काळाचा महिमा अगाध आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये या पर्यटनस्थळांमध्ये खूप मोठा बदल, खूप प्रचंड आर्थिक, सामाजिक स्थित्यंतरे झाली आहेत. खूप नवीन शाळांची, नवीन हॉटेल्सची निर्मिती झाली आहे. अनेक प्रसिद्ध महात्म्यांनी प्रसिद्ध व्यक्तींनी येथे भेटी दिल्या आहेत. हे बदल पुस्तकांमुळे जपले गेले, सर्वांनां समजले.

माझी जुनी रेखाटने पहात असताना मला ह्या बदलांची तीव्रतेने जाणीव होते. कदाचित आणखी 100 वर्षांनंतर ही स्केचेस पाहणाऱ्या त्या पिढीतील लोकानां हे बदल आणखी मजेशीर वाटतील. त्यासाठी अजूनही जुन्या संदर्भ पुस्तकांच्या मी शोधात आहे. आपल्या सर्वानां विनंती की अशी काही जुनी पुस्तके वाई, पांचगणी , महाबळेश्वर, प्रतापगड संदर्भातील असतील तर मला 9423966486 या नंबरवर जरूर कळवा. कारण माझे पुस्तक छापल्यानंतर चुकीचा इतिहास, चुकीची माहीती छापली जाऊ नये, हीच इच्छा आहे.

या पुढील वर्षी 2022 मध्ये आमच्या “संजीवन विद्यालय’ या शाळेला 100 वर्षे पुर्ण होत आहेत . त्या शाळेने माझ्यातील चित्रकार बालवयातच जागृत केला आणि चित्रांच्या एका नव्या अनोख्या विश्वात मला पाठवले. तेव्हा माझ्या या “स्केचबुक’ पुस्तकाच्या निमित्ताने त्या शतकवर्षी महोत्सवाच्या आनंदात व या पर्यटन स्थळांमध्ये झालेल्या नव्या बदलांची, माहीतीची ओळख सर्वांना होऊन त्यांच्या आनंदात नक्कीच मोलाची भर पडेल, अशी आशा करतो.

Leave a Comment