दहा महिन्यांत तब्बल 55 लग्ने ठरवली रद्दबातल

विजयकुमार कुलकर्णी

पुणे – खोटी माहिती देऊन लग्न करणाऱ्या जोडीदारांना न्यायालयाने दणका दिला आहे. गेल्या 10 महिन्यात तक्रारदारांना दिलासा देत कौटुंबिक न्यायालयाने 55 लग्ने बेकायदेशीर ठरवत रद्दबातल केली आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे अलीकडच्या काळात किरकोळ कारणावरून झालेले पती-पत्नीचे वादही न्यायालयात पोहोचत आहेत.

घटस्फोटाची संख्या तर वाढलीच आहे. त्यामध्ये वेळ जाऊ नये, यासाठी दोन्ही जोडीदारांकडून परस्पर संमतीने घटस्फोटाच्या मार्गाचा अवलंब केला जातो. यामध्ये तुलनेने लवकर घटस्फोट होता. मात्र, त्याचबरोबर एका जोडीदाराने दुसऱ्या जोडीदाराची फसवणूक केल्याचे लगेच लक्षात येते. त्यावेळी घटस्फोट घेण्याऐवजी लग्न रद्द करण्यासाठी अर्ज केला जातो. आता लग्न रद्द करण्यासाठी करण्यात येणाऱ्या अर्जाचे प्रमाणही काही प्रमाण वाढत आहे.

या कारणासाठी लग्न रद्द करू शकतात…

लग्न करीत असलेल्या व्यक्‍तीचे आधीच लग्न झालेले नसावे, झाले असल्यास घटस्फोट झालेला असावा, लग्नाला दोघांची संमती असावी, दोघेही शारीरिकदृष्टा सुदृढ असावेत, ते वैवाहिक शारीरिक संबंध ठेवू शकतील, त्याबाबत त्यांच्यात काही शारीरिक उणिवा नसाव्यात. स्त्री अन्य व्यक्तीपासून गरोदर असल्यास, दोघांचे वय कायद्याप्रमाणे योग्य असावे आणि वधू आणि वरात मामा, काका, मावशीचा मुलगा, चुलत भाऊ, असे नाते नसावे, अशा अटी कलमात आहेत. त्या पाळल्या गेल्या नसतील तर तक्रारदाराला न्यायालयात दाद मागता येते.

“घटस्फोट घेतल्यानंतर “घटस्फोटित’ असा शिक्‍का पडतो. मात्र, चूक नसतानाही जोडीदारांकडून फसवणूक झाली आहे. त्यामुळे लग्न रद्द करण्यासाठी अर्ज केला जातो. 2023 मध्ये आतापर्यंत 79 अर्ज लग्न रद्द करण्यासाठी आले आहेत. त्यापैकी 55 अर्ज निकाली निघाले आहेत.”- ऍड. वैशाली चांदणे, अध्यक्ष, दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, पुणे

कधी करता येतो लग्न रद्द करण्यासाठी अर्ज?

लग्न करताना त्यात कोणते विधी झाले पाहिजेत, तसेच त्यातील कोणत्या पारंपरिक बाबी पाळल्या पाहिजेत, याबाबत हिंदू विवाह कायद्यात काही अटी कलम 5 मध्ये नमूद केल्या आहेत. त्या अटीचे पालन न केल्यास लग्न रद्द करण्यासाठी कलम 12 नुसार अर्ज करता येतो. हा अर्ज लग्न झालेल्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत करावा लागतो. अर्ज आल्यानंतर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायालय निर्णय देत असते.