केंद्र सरकारने औरंगाबादच्या नामकरणाला मंजुरी देताच राज ठाकरे म्हणतात,”हेच खरं हिंदवी…”

मुंबई – औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे ‘धाराशिव’ करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला शुक्रवारी केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, कित्येक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या या दोन जिल्ह्यांच्या नामांतरावर अखेर केंद्राकडूूनही शिक्‍कामोर्तब करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्‌विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील याबाबत ट्विट करत केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

“औरंगाबादचं ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं ‘धाराशिव’ करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे त्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक आभार… परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य” अशा आशयाचे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,”औरंगाबादचे “छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे “धाराशिव’! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने करून दाखविले”

असा आहे नामांतराचा प्रवास
1988 – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेत संभाजीनगर नामकरण करण्याचा नारा
1995 – औरंगाबादचे “संभाजीनगर’ नामांतर करण्याचा ठराव मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविला
1995 – शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना नामकरणाची अधिसूचना जारी
1996 – मुश्‍ताक अहेमद यांची नामकरणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
1999 – राज्यात सत्तांतर झाल्याने नामकरणाचा प्रस्ताव रखडला
2002 – मुश्‍ताक अहेमद यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका निकाली
2021 – “सुपर संभाजीनगर’ असा नारा देत शहरात फलक
2022 – 29 जून रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय
2022 – 14 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाने महाविकास आघाडी सरकारने केलेला नामांतराचा ठराव रद्द
2022 – 16 जुलै मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावाला पुन्हा मंजुरी
2023 – केंद्र सरकारकडून औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यावर शिक्‍कामोर्तब