प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अश्‍विनी बनली पीएसआय

कार्ला – सुदुंबरे येथील शेतकरी कुटुंबातील अश्‍विनी विशाल गाडे यांनी प्रतिकूल परिस्थितीशी सामना एमपीएससी या परीक्षेत यश संपादन करत, पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न साकार केले.विशेष म्हणजे लग्नानंतर सासरच्या मंडळींची साथ मिळाल्याने अभ्यासाकरिता पोटच्या वीस दिवसाच्या मुलाला घरी ठेवून मोठ्या चिकाटीने अभ्यास केला. या प्रयत्नांना यश आल्याने माहेर-सासरबरोबरच परिसरात तिच्या यशाचे कौतुक होत आहे.

मावळातील ताजे गावातील यशवंत केदारी यांची मुलगी अश्‍विनीचे सातवी पर्यंतचे शिक्षण ताजे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. व्हीपीएस भाजे या शाळेमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले तर कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयात शिक्षण घेत असताना बारावीमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अश्‍विनीचे बारावीनंतर लग्न झाले. सुदैवाने सासरच्या लोकांनी तिची शिकण्याची इच्छा बघून तिला पुढील शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने सुदुंबरे येथील सिद्धांत कॉलेजमध्ये बीसीए ही पदवी पूर्ण केली.

अश्‍विनीचे सासू-सासरे, दिर-जाऊबाई आणि पती यांचा आधार अश्‍विनीच्या प्रयत्नांना अधिकाधिक ऊर्जा व उत्साहा देत होता. यातच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला आणि जिद्दीने यश संपादन केले. मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना अगदी वीस दिवसाच्या मुलालाही घरी सोडून अभ्यासाला गेल्याचे सांगितले.