Asia Cup 2022 : ‘या’ प्रमुख फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे अंतिम संघनिवडीची रोहितसमोर डोकेदुखी

दुबई – आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेला येत्या शनिवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी कसून सराव करत सज्ज होत असलेल्या भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल यावर आता चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच सलामी, मधली फळी यात असलेल्या पर्यायांची निवड कशी करायची हीच कर्णधार रोहित शर्मासमोरची सर्वात मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी येत्या रविवारी होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू सध्या दुबईतील नॅशनल स्टेडियमवर कसून सराव करत आहेत. भारतीय संघ कागदावर जरी बलाढ्य वाटत असला तरीही संघातील लोकेश राहुल व विराट कोहली यांच्या सुमार कामगिरीमुळे त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातच कर्णधार रोहितही यंदाच्या संपूर्ण मोसमात फारशी चमक दाखवु शकलेला नाही. त्यामुळे सलामीला रोहितसह कोण फलंदाजी करणार हा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही.

सूर्यकुमार यादवने काही सामन्यांत सलामीला फलंदाजी केली असली तरीही थेट पाकिस्तानसमोर रोहित त्याला ही जबाबदारी देणार का हा प्रश्‍न आहे. एक प्रयोग म्हणून कोहलीनेही काही वेळ डावाची सुरुवात केली मात्र, जो धोका सूर्यकुमारबाबत दिसतो तोच कोहलीबाबतही राहणार आहे. त्यामुळे राहुलच रोहितसह डावाची सुरुवात करेल असेच चित्र सध्यातरी दिसत आहे.

पहिले पाच फलंदाज ठरवताना रोहित, राहुल, कोहली व सूर्यकुमार यांचे स्थान निश्‍चित आहे. मात्र, पाचव्या क्रमांकावर दीपक हुडा, दीनेश कार्तिक तसेच ऋषभ पंत यांच्यापैकी कोणाला खेळवायचे हा देखिल एक प्रश्‍न आहे. दीपक हुडाला संघात स्थान दिले तर कार्तिक व पंत यांच्यापैकी एकाचीच निवड करावी लागणार आहे. हुडा फलंदाज म्हणून सरस असला तरी त्याची गोलंदाजी फारशी यशस्वी ठरलेली नाही. परंतू कार्तिकला संघात स्थान दिले तर पंतला बाहेर बसवले जाणार का तसेच कार्तिक यष्टीरक्षणाबाबत पंतपेक्षा सरस असून त्याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत फिनिशरची भूमिकाही यशस्वीपणे वठवली आहे.

रवींद्र जडेजा व हार्दीक पंड्या यांचे स्थान निश्‍चित आहे. गोलंदाजीचा विचार केला तर अनुभवी भुवनेश्‍वर कुमारसह नवा चेंडू कोण वापरणार यावरही खलबत करावे लागेल. अर्शदीप सिंगचे पारडे जड असले तरीही आवेश खानलाही संधी मिळू शकते. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह व नवोदित हर्षल पटेल संघात नसल्यामुळे प्लेइंग इलेव्हन काय असावी याबाबत रोहितची डोकेदुखी वाढणार आहे.

अर्शदीपचे पारडे जड

भारतीय संघाला यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून एक नवा वेगवान गोलंदाज गवसला आहे. अर्शदीप सिंग या गोलंदाजाने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत डेथ ओव्हर्समध्ये कमालीचे सातत्य दाखवले आहे. त्याचे फसवे यॉर्कर चेंडू केळताना भल्या भल्या फलंदाजांना अपयश आल्याचे दिसून आले. त्याने अतंत कमी सामने खेळतानाही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत सातत्य दाखवल्यावर भारतीय संघात पदार्पण केले. त्याने आतापर्यंत अवघे 6 सामने खेळताना 6.33 या स्वप्नवत सरासरीच्या जोरावर 9 बळी घेतले आहेत. त्यामुळेच निवड समितीनेही त्याचेच पारडे जड असल्याचे संकेत दिले आहेत.

रोहितच्या कामगरीकडेही लक्ष

भारतीय संघाचे कर्णधारपद हाती आल्यापासून रोहित शर्मानेही फारशी चमकदार कामगिरी केलेली नाही. त्याच्या बॅटमधूनही मोठी खेळी झालेली नाही. यंदाच्या मोसमात विराट कोहलीने संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर रोहितकडे भारताच्या कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 संघाचे नेतृत्व आले मात्र, कर्णधारपदाच्या अतिरीक्त दडपणामुळे त्याची वैयक्तिक कामगिरी सुमारच राहिली आहे. आता या स्पर्धेत त्याच्याकडून कशी कामगिरी होते यावरही लक्ष राहणार आहे. त्यानेही यंदाच्या मोसमात कोहलीप्रमाणे काही मालिकांमधून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तो देखिल ताजातवाना झाला असून त्याची बॅट भरात आली तर भारतीय संघ या स्पर्धेचे विजेतेपद निश्‍चितच मिळवू शकतो.