आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा : यजमानपद गेल्यास पाकिस्तानचा बहिष्कार

दुबई -बीसीसीआय, बांगलादेश व श्रीलंका क्रिकेट मंडळांनी सुरक्षेचा मुद्दा पुढे करत पाकिस्तानात आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा होऊ नये, असा पवित्रा घेतल्यामुळे आशिया क्रिकेट समिती पाकिस्तानकडून या स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्याची शक्‍यता वाढली आहे. मात्र, जर यजमानपद काढून घेतले गेले तर आम्ही या स्पर्धेवरच बहिष्कार टाकू, असा इशारा पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिला आहे. आता याबाबत लवकरच आशिया क्रिकेट समितीची बैठक होणार असून, त्यातच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

दोन्ही देशांतील राजकीय तणावामुळे भारताने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. अशा स्थितीत भारताचे सामने अमिरातीत व्हावेत, असा पर्याय समोर आला. मात्र, त्यालाही पाकिस्तानची तयारी नसल्याने बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये संघ पाठवण्यास पुन्हा नकार कळवला होता. त्यातच श्रीलंका क्रिकेट मंडळाने बांगलादेश क्रिकेट मंडळाप्रमाणेच ही स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शवली होती. आता आशिया समिती या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेत श्रीलंकेला बहाल करण्याची शक्‍यता बळावली आहे.

ही स्पर्धा पाकिस्तानऐवजी श्रीलंकेत हलवण्यात आली तर त्यात पाकिस्तानचा संघ खेळणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला असून, आमचे यजमानपद काढले गेले तर स्पर्धेवर बहिष्कार घालू, असा थेट इशारा पाकिस्तान मंडळाने दिला आहे. यंदाची आशिया करंडक स्पर्धा 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये होणार आहे. त्यासाठी सप्टेंबर-ऑक्‍टोबरची विंडो खुली असून तो कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. मात्र, त्याचे वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही. याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. जर ही स्पर्धा श्रीलंकेला दिली गेली तर दंबूला आणि पालेकेल्ले या दोन शहरातच सामने होतील.

कोलंबोमध्ये सप्टेंबर महिन्यात मॉन्सूनचा जोर जास्त असतो, त्यामुळे याच दोन ठिकाणांची निवड होऊ शकते. पाकिस्तानचा संघ सहभागी झाला तर सहा देशांत किंवा त्यांनी बहिष्कार घातला तर पाच देशांतच ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारत, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या पाच देशांमध्ये ही स्पर्धा होईल.

भारतातील स्पर्धेबाबत पाक काय करणार
आशिया करंडकावर बहिष्कार टाकला तरी पाकिस्तानच्या संघाला भारतात होत असलेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळावेच लागेल. कारण ही स्पर्धा आयसीसीची आहे व यातून जर कोणत्या देशाने माघार घेतली तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते, तसेच त्यांना काही कालावधीसाठी आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यावरही बंदी लावली जाऊ शकते. त्यामुळे आता या स्पर्धेबाबत पाकिस्तान क्रिकेट मंडळ काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.