आशिया करंडक हॉकी | अंतिम फेरी गाठण्यात भारताला अपयश

जकार्ता – दक्षिण कोरियाविरुद्धच्या सुपर फोर गटातील अखेरच्या साखळी लढतीत भारतीय संघाला 4-4 असे बरोबरीवर समाधाना मानावे लागले. त्यामुळे यंदाच्या आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाला स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. आता दक्षिण कोरिया व मलेशिया यांच्यात बुधवारी अंतिम लढत होणार आहे.

मंगळवारी झालेल्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने कोरियावर जबरदस्त आक्रमण केले. मात्र, या सामन्यात 4-3 अशी आघाडी असतानाही अखेरच्या काही सेकंदात भारताचा बचाव कमी पडला व कोरियाने गोल करत बरोबरी राखली. अन्य लढतीत मलेशियाने जपानचा 5-0 असा पराभव केला होता, त्यामुळे भारतीय संघाला कोरियाविरुद्ध विजयाची नितांत गरज होती. या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यांतून मलेशिया व कोरिया यांनी प्रत्येकी 5 गुण मिळवले.

भारताला गोल संख्येत आघाडी घेण्यात अपयश आले व स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. कोरियाविरुद्धच्या लढतीत भारताच्या नीलम संजीपने 9, दीपशान तिक्रीने 21, महेश शेशे गौडाने 22, तर शक्‍तीवर मरीस्वरनने 37 व्या मिनिटाला गोल केले. दक्षिण कोरियाकडून जॅंग जोंगयून 13, जी वू चिऑन 18, किम जिंगहू 28 यांनी गोल केले. मात्र, अखेरच्या महत्त्वाच्या क्षणी जूंग मांजाएने 44 व्या मिनिटाला गोल करत हा सामना बरोबरीत सोडवला व संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले.