#AsiaCup2023 #INDvPAK : भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या.. दोन्ही संघांचे प्लेइंग -11

पाल्लेकेले :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यात साखळीतील लढत होत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या या सामन्याकडे संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.

आशिया करंडक स्पर्धेत सलामीच्या लढतीत यजमान पाकिस्तानने ज्या पद्धतीने नेपाळविरुद्ध फलंदाजी केली ती पाहता भारतीय संघासमोर मोठे आव्हान राहणार आहे.

भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्यास 3 वाजता सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार रोहित शर्मानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

वनडे प्लेइंग-11 मध्ये श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह याचं पुनरागमन झालं आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजा आणि कुलदीप चहल हे दोन फिरकीपटू म्हणून संघात आहेत. मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आलेला नाही, त्याचवेळी संघ व्यवस्थापनाने शार्दुल ठाकूरला संधी दिली आहे. दुसरीकङे पाकिस्तानने आपल्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यांनी पहिल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला आहे.

दोन्ही संघाचे Playing 11 खालीलप्रमाणे…

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान : फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.

पावसामुळे सामना रद्द झाल्यास?

या सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. गेले दोन दिवस येथे वारंवार पाऊस पडत आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण 50 षटकांचाच होणार का असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सामना किमान 20 षटकांचा खेळवण्यात यश आले तर निकाल हाती येणार आहे. मात्र, ते देखील शक्‍य झाले नाही व सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना गुण वाटून दिले जातील. अशा स्थितीत सलामीच्या लढतीत नेपाळचा पराभव केलेला पाकिस्तानचा संघ सुपर फोरसाठी पात्र ठरेल मात्र, भारतीय संघाला पात्र होण्यासाठी नेपाळविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल.