#AsiaCup2023 #INDvPAK : इशान-हार्दिकची अर्धशतके; Team India चे पाकसमोर 267 धावाचं आव्हान…

पाल्लेकेले :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यात साखळीतील लढत होत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या या सामन्याकडे संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.

इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 48.5 षटकात सर्वबाद 266 धावा करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 267 धावाचं आव्हान ठेवलं आहे. भारताकडून इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी अनुक्रमे 82 आणि 87 धावा केल्या.या दोघांशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला 20 धावांचा आकडाही गाठता आला नाही.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताची सुरूवात खराब झाली. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने रोहित शर्माला क्लीनबोल्ड करत भारताला पहिला धक्का दिला.रोहितने 22 चेंडूत 11 धावा केल्या.

रोहित शर्मानंतर शाहीन आफ्रिदीनेही विराट कोहलीला बोल्ड केले. किंग कोहलीला केवळ चार धावा करता आल्या. त्यानंतर भारताला 10व्या षटकात तिसरा धक्का बसला. श्रेयस अय्यर 9 चेंडूत 14 धावा करून झेलबाद झाला. हरिस रौफने अय्यरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर शुबमन गिल 32 चेंडूत 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गिलला हारिस रौफने बोल्ड केले.

टीम इंडियाने पहिल्या 15 षटकातच 66 धावांवरच चार विकेट गमावल्या होत्या.चार विकेट पडल्यानंतर ईशान किशन आणि उपकर्णधार हार्दिक पांड्याने भारताचा ङाव सावरला. 38व्या षटकात 204 धावांवर भारताची पाचवी विकेट पडली. शानदार फलंदाजी करणारा इशान किशन 82 धावा करून बाद झाला. इशानला हरिस रौफने झेलबाद केले. इशानने 81 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 82 धावांची खेळी केली.

हार्दिक आणि इशान यांनी पाचव्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी करत संघाला लवकर ऑलआऊट होण्यापासून वाचवले.इशान किशननंतर हार्दिक पांड्याही काही धावांच्या अंतरावर बाद झाला. 43.1 षटकात भारताची धावसंख्या 239 असताना हार्दिक बाद झाला.हार्दिक पांड्यापाठोपाठ रवींद्र जडेजाही पॅव्हेलियनमध्ये परतला. शाहीन आफ्रिदीने दोघांनाही एकाच षटकात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हार्दिकने 87 आणि जडेजाने 14 धावांंची खेळी केली.

शानदार फलंदाजी करणाऱ्या हार्दिक पंड्याचे शतक थोङक्यात हुकले. तो 90 चेंडूत 87 धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 1 षटकार आला. हार्दिक पांड्याचे वनडेतील 11 वे अर्धशतक ठरले. त्याने 34व्या षटकात आगा सलमानच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले.

टीम इंडियाची आठवी विकेट 242 धावांवर पडली. हार्दिक आणि जडेजानंतर शार्दुल ठाकूरही बाद झाला. शार्दुलला नसीम शाहने झेलबाद केले. यादरम्यान अवघ्या तीन धावांत भारताने आपले 3 विकेट गमावल्या.

भारताला नववा धक्का 49व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बसला. नसीम शाहने कुलदीप यादवला बाद केले. कुलदीपला यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने झेलबाद केले. त्याने 13 चेंडूंच्या खेळीत चार धावा केल्या. त्यानंतर बुमराह 16 धावा काढून झेलबाद झाला तर मोहम्मद सिराज एक धाव घेत नाबाद राहिला.

दरम्यान, पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 10 षटकात 35 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले. नसीम शाह आणि हरिस रौफ यांना प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.