हवेतील प्रदूषणामुळे वाढतायत अस्थमाचे बळी

पुणे – हवेतील वाढत्या प्रदूषणाचे बळी हे अस्थमा रुग्ण ठरत असल्याचे दिसून आले आहे. पुण्यात प्रदूषणाने उच्च पातळी गाठली असून, मर्यादेचे उल्लंघन झाले आहे. शहरातील खराब वायू गुणवत्ता निर्देशांकाचा (एक्‍युआय) थेट परिणाम श्‍वसनाचे आजार असलेल्या रुग्णांवर होतो. “क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी) आणि अस्थमाग्रस्त लोकांमध्ये वाईट लक्षणे दिसून येत असून खराब हवेच्या गुणवत्तेचे पहिले बळी हेच रुग्ण ठरत आहेत.

जे निरोगी आहेत त्यांना कोरड्या खोकल्याचा त्रास होत असून, जे सतत फिरतीच्या कामावर असतात आणि प्रदूषित हवेच्या थेट संपर्कात येतात त्यांना हा त्रास होत आहे. हा परिणाम अल्पकालीन आणि औषधांनी बरा होणारा असला तरी हे असेच सुरू राहिल्यास फुफ्फुसांच्या तक्रारी वाढू शकतात, असे तज्ज्ञ डॉक्‍टर सांगतात.

“केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने (सीपीसीबी) प्रसिद्ध केलेल्या दैनिक बुलेटिननुसार शनिवारपर्यंत पुण्याचा “एक्‍युआय’ 176 वर होता जो मध्यम आहे आणि गेल्या काही आठवड्यांपासून तो मध्यम राहिला आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयामधील बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्ण श्‍वसनात अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार हे रुग्ण करत असल्याचे ससूनमधील “पल्मोनरी’ विभागाचे प्रमुख डॉ. संजय गायकवाड यांनी सांगितले.

सतत संपर्कात राहिल्यास गंभीर स्थिती

येथे येणारे बहुतेक रुग्ण त्वरित तपासणीसाठी येत नाहीत आणि केवळ लक्षणे बिघडल्यावरच येतात. निरोगी रुग्णांमध्येही कोरडा खोकला आठवडे हे एक जुनाट लक्षण आहे आणि काहींना “कफ’सह खोकला येऊ शकतो. सततचा खोकला हे वायू प्रदूषणामुळे आरोग्याचे तत्काळ लक्षण आहे,असे डॉ. गायकवाड म्हणाले.

लहान मुलांवर दीर्घकालीन परिणाम

लहान मुलांवरही दीर्घकालीन परिणाम दिसून येत आहेत. प्रदूषित भागात वाढलेल्या अशा मुलांची फुफ्फुसाची आवश्‍यक तेवढी वाढ होत नाही आणि जेव्हा त्यांना फुफ्फुसाचे जुनाट आजार होतात तेव्हा ते अधिक असुरक्षित होतात. हा दीर्घकालीन परिणाम आहे. पुण्यातील वायू प्रदूषणाचे तीन मुख्य स्त्रोत म्हणजे वाढलेले बांधकाम, वाहनांचे प्रदूषण आणि तिसरे म्हणजे वाऱ्याच्या हालचालींवर हवामान बदलाचा परिणाम, हे देखील आहे, असे मत “पल्मोकेअर रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन’चे संचालक डॉ. संदीप साळवी यांनी व्यक्त केले.