पुणे | मतदान सुरू होण्याअधीच मतदार केंद्रावर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “मॉर्निंग वॉकवरून घरी जाण्यापेक्षा मतदान करूनच घरी जाऊ’ या विचाराने कोथरूड मतदारासंघातील मतदारांनी पहाटे साडेसहा वाजल्यापासून म्हणजेच मतदान प्रक्रिया सुरू होण्याआधीच मतदान केंद्रावर गर्दी केली होती. त्यामुळे सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होताच केंद्राबाहेर मोठी रांग लागली होती. हे चित्र बहुतांश केंद्रावर दिसून आले.

कोथरूड म्हणजे जागरूक मतदार, त्याठिकाणी नेहमीच मतदारांचा टक्का अन्य मतदारसंघाच्या तुलनेत अधिक होतो. त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून कोथरूडमधील मतदारासंघातील सर्वच केंद्रावर मतदारांची वर्दळ अधिक दिसून आली.

महेश विद्यालय, पंडित दीनदयाळ, बाल शिक्षण मंदिर, अभिनव शाळा, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर येथी ट्री हाऊस शाळा यासह बहुतांश केंद्रावर गर्दी झाली होती. त्यामुळे सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत मतदानाचा टक्का टप्याटप्याने वाढत होता. दुपारी एक वाजेपर्यंत जवळपास 27 टक्के मतदान झाले होते.

दुपारी एकनंतर मतदानासाठी येणाऱ्यांची संख्या काहीशी घटली. त्यात आज उन्हाचा चटका अधिक जाणवत असल्यामुळे वस्ती भाग परिसरातील मतदानकेंद्रावर गर्दी कमी दिसून आली. तर काही भागात सकाळपासून मतदारांचा फ्लो कायम होता. दुपारी चारनंतर केंद्रावर पुन्हा गर्दी वाढू लागली.

मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास जसजसे ढग दाटून आले, तसे शास्त्रीनगर, भेलके चौक, कर्वेनगर, वारजे, पौड रोड यासह अन्य भागात वारे आणि पावसाला सुरवात झाली. त्यामुळे मतदारांची धांदल उडाली. मात्र, काही किरकोळ आणि तांत्रिक गोंधळ सोडला तर कोथरूड मतदारसंघातील मतदान प्रक्रिया शांतते पार पडली.

एकाच मतदाराचे दोन ठिकाणी नाव; तर काहींची नावे गायब
मतदान करायचे पण मतदार यादीत नावच नाही. घरातल्या दोघांची नावे यादीत आहे, पण अन्य तिघांची नावे गायब आहेत, असा प्रकार बहुतांश केंद्रावर दिसून आला. धक्कादायक म्हणजे काही मतदारांची नावे दोन दोन ठिकाणी आली होती. त्यामुळे नक्की मतदान कुठल्या केंद्रावर करायचे, अशी संभ्रमावस्था झाली होती.

बोगस मतदानाने मतदारांमध्ये चिडचिड; संताप
मतदार यादीत नाव नसल्यामुळे अनेक मतदारांना मतदान करता आले नाही. तर ज्यांचेकडे मतदानाची स्लिप आहे, ते मतदान केंद्रावर गेल्यावर त्यांच्या नावावर आधीच कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मतदान केल्याचे दिसून आले. त्यामुळे कोथरूड परिसरात तीन ते चार मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचे समोर आले.

त्यामुळे मतदारांमध्ये चिडचिड आणि संताप होता. ट्री हाऊस शाळेत अशाप्रकारे एका वृद्ध महिलेचे मतदान झाल्यावर नागरिकांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे संताप व्यक्त केला.

मशीनमध्ये बिघाडामुळे गोंधळ
कोथरूड परिसरातील पंडित दीनदयाळ शाळा यासह कर्वेनगर, शिवतीर्थनगर या परिसरातील मतदान केंद्रावर मतदान मशीनमध्ये तांत्रीक अडचणी आल्या. त्यामुळे मतदारांना ताटकळत उभे रहावे लागले. निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ नवीन मशीन आणून मतदान प्रक्रिया सुरळीत केली.