nagar | वकिलांवर हल्ला हा न्यायव्यवस्थेवर हल्ला : किरण काळे

नगर, (प्रतिनिधी) – ॲड. अशोक कोल्हे यांच्यावरिल हल्ल्याची घटना दुर्दैवी आहे. काही दिवसांपूर्वी राहुरीत वकील दांपत्यांचा निर्घृण खून झाला होता. याबाबत सरकारकडे वकील संरक्षणाच्या संदर्भातला कायदा पारित करण्याची मागणी काँग्रेसने वकिलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत केली होती. मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळेच हल्ला करणाऱ्यांचे धाडस वाढत आहे. पक्षकारानेच ॲड. कोल्हे यांच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे.

हा हल्ला केवळ ॲड. कोल्हे यांच्यावर नसून हा न्याय व्यवस्थेवरील हल्ला आहे, असे शहर कॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली. नगर शहरामध्ये सध्या गुंडाराज फोफावले आहे. पोलिसांनी याचा खात्मा करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

किरण काळे म्हणाले, शहरात होणारे खून, व्यापारी, उद्योजक, सर्वसामान्य नागरिकांच्या प्लॉटवर होणारी ताबेमारी, अवैध धंदे, वकील, डॉक्टर यांच्यावर सातत्याने होणारे हल्ले, शहरातील तरुणांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये होणाऱ्या मारामाऱ्या, यामध्ये बंदुकी, कट्टे तलवारी, कोयते यांचा होणारा वापर यामुळे पोलिसांचा धाक शहरात उरला आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.

शहरामध्ये अनेक छोट्या मोठया गॅंग अलीकडील काळात तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. या गॅंग्सला राजकीय वरदहस्त दिला जात आहे. अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. अशा काळात वातावरण कलुशीत झाल्यास याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो.