पोलीस बसवरील हल्ला नियोजनबद्ध – महानिरीक्षक

श्रीनगर – काश्‍मीरात काल पोलिसांच्या बसवर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला पुर्वनियोजित होता असे काश्‍मीरचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी म्हटले आहे. ते आज येथील एका शहीदाच्या शवपेटीवर पुष्पच्रक वाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

हा हल्ला जेैश ए महंमदच्या दहशतवाद्यांनी केला असे त्यांनी स्पष्ट केले. 25 पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन येणारी बस नेहमीप्रमाणेच परतत असताना या संघटनेच्या तीन दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला असे ते म्हणाले.

हा हल्ला करण्यापुर्वी दहशतवाद्यांनी रेकी केली होती व बस किती वाजता कोणत्या मार्गाने येते याची माहिती त्यांनी मिळवली होती. या हल्ल्यातील 11 जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान हल्लेखोरांच्या संबंधात आम्हाला महत्वाची माहिती मिळाली आहे असेही त्यांनी नमूद केले. तीन हल्लेखोरांपैकी एक जण स्थानिक असून अन्य दोन जण विदेशी आहेत.

या हल्लेखोरांना लवकरच नेस्तानबूत केले जाईल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. काल झालेल्या हल्ल्याचा बस मधील पोलिसांनी धैर्याने मुकाबला केल्याचेही त्यांनी नमूद केले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक हल्लेखोर जखमी झाला आहे.

तथापि त्याला त्याचे अन्य दोन साथीदार तेथून घेऊन फरारी झाले आहेत. पण ते फार काळ लपू शकणार नाहीत असेही विजयकुमार यांनी सांगितले. भविष्यातील अशा स्वरूपाचे हल्ले टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना नमूद केले.