जमिनीच्या तुकड्यासाठी नवऱ्याला उप्पीटमधून विष घालून मारण्याचा प्रयत्न ; पत्नी अन् मेहुण्यास अटक

बेळगाव : पतीच्या जमिनीसाठी पत्नीने नाश्तामधून विष घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.गोरेबाळ (ता. सौंदत्ती) याठिकाणी ही घटना घडली आहे. उप्पीटमध्ये विष घालून पतीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निंगाप्पा फकिराप्पा हमानी असे अत्यवस्थ  असलेल्या पतीचे नाव आहे.

दरम्यान, या प्रकरणात निंगाप्पाची पत्नी आणि तिच्या भावाविरूद्ध (निंगाप्पाचा मेहुणा) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विषमिश्रित उप्पीट खाल्यामुळे निंगाप्पा ११ ऑगस्ट रोजी अत्यवस्थ झाले. त्यासाठी हुबळीतील किम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

निंगाप्पा याची पत्नी सावक्का व तिचा भाऊ फकिराप्पा लक्ष्मण सिंधूगीने मिळून हत्येचा कट रचला होता. निंगाप्पाच्या नावे गावात दोन एकर शेती आहे. शेतजमीन हडप करण्यासाठी निंगाप्पाचा खून करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी उप्पीटमध्ये विष घालून त्याचा खून करण्याचे नियोजन होते. त्यानुसार ११ रोजी उप्पीटमध्ये विष घालून निंगाप्पाला खायाला दिले. पण, ते खाल्यामुळे अत्यवस्थ झाले.

त्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी हुबळीत दाखल केले आहे. तेंव्हापासून ते आजपर्यंत त्यांची प्रकृती अद्याप स्थिर नाही. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहिती आधारे पोलिसांनी दोघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस चौकशीत मालमत्ता बहीण आणि भावाने मिळून कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले.

विषमिश्रित उप्पीटमुळे सौंदत्ती येथील निंगाप्पा हमानी अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे हेच उप्पीट कुत्रे आणि मांजराने खाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती चौकशीत पोलिसांना मिळाली आहे.