डेन्मार्कच्या पंतप्रधानांना धक्काबुक्कीचा प्रयत्न; हल्लेखोराला पोलिसांनी केली अटक

Mette Frederiksen – डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडेरिकसन यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न काल एका व्यक्तीने केला. कोपनहेगन शहराच्या मध्यभागात हा प्रकार घडला असून पोलिसांनी या ३९ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

त्याला आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या हल्ल्याबद्दल अधिकाऱ्यांनी अधिक तपशील दिलेला नाही आणि फ्रेडरिकसन यांना काही दुखापत झाली की नाही हे स्पष्ट झाले नाही.

दोन प्रत्यक्ष साक्षीदारांनी या घटनेबद्दल वृत्तसंस्थेला माहीती दिली. त्यांच्या दिशेने चालत जाणाऱ्या या व्यक्तीने पंतप्रधान मोट फ्रेडरिकसन यांना खांद्याला धरून ढकलले. त्यानंतर फेडरिकसन यांनी त्याचा हात झटकला या गडबडीत त्यांचा तोल गेला. मात्र त्या खाली पडल्या नाहीत.

अन्य एका साक्षीदारानेही याबाबत थोडी जास्त माहीती दिली. मारहाण करणारा माणूस चांगल्या कपड्यातील होता. तो पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतीलच एक असावा, असे वाटत होते.

ही घटना झाल्यानंतर मेट फ्रेडरिकसन यांना कोणतीही दुखापत झालेली दिसली नाही. त्या लगेचच तेथून निघून गेल्या. जे काही घडले त्यामुळे पंतप्रधानांना धक्का बसल्याचे पंतप्रधानांच्या कार्यालयाने माध्यमांना सांगितले.

लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या पंतप्रधानांवरील हल्ला म्हणजे आपल्या लोकशाहीवरीलच हल्ला समजला पाहिजे, असे स्वीडनच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. तर युरोपीय कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

युरोपियन संघाच्या संसदीय निवडणुका सध्या डेन्मार्क आणि उर्वरित २७ देशांच्या गटात सुरू आहेत आणि रविवारी संपतील. फ्रेडरिकसन या सोशल डेमोक्रॅट्सच्या युरोपीय संघाच्या आघाडीच्या प्रमुख उमेदवार क्रिस्टेल शाल्डेमोस यांच्यासोबत प्रचार करत आहेत. मात्र फ्रेडरिकसन यांना झालेल्या धक्काबुक्कीचा या प्रचाराशी काही संबंध नसल्याचे माध्यमांनी म्हटले आहे.