लक्षवेधी : तैवान चीनशी भिडणार?

– आरिफ शेख

रशियासारख्या बलाढ्य देशाला युक्रेनसारखे छोटे राष्ट्र दोन-अडीच वर्षे झुंजवू शकते, हा आदर्श घेऊन आता तैवाननेही चीनशी दोन हात करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सीमेवर युद्धाचे ढग जमा व्हायला लागले आहेत.

तैवानला चीन हा आपलाच भूभाग मानतो; परंतु तैवानने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र जाहीर केले आहे. जगाने त्याला मान्यता दिली नसली, तरी तेथे चीनचे वर्चस्व मान्य न करणारे सरकार सलग तिसर्‍यांदा सत्तेवर आले आहेत. तैवानच्या नवीन राष्ट्रपतींनी शपथ घेताच चीन अचानक आक्रमक झाला. कधी नव्हे, एवढी युद्ध कसरत त्याने केली. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या जहाजांनी आणि लढाऊ विमानांनी आपण तैवानला वेढा कसा घालू शकतो हे दर्शविण्यासाठी आकाश आणि समुद्रात दोन दिवस लष्करी कवायती केल्या. चीनसाठी ही युद्धाची रंगीत तालीमच होती.

चीनने तैवान सामुद्रधुनीत निर्माण केलेल्या परिस्थितीला ‘न्यू नॉर्मल’ म्हणता येईल. स्वतःचे सरकार चालविणार्‍या तैवानवर चीनने हळूहळू लष्करी दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. तैवानवर दबाव वाढवण्यासाठी चीन याआधीही लष्करी कवायती करत आहे, मग या वेळी वेगळे काय? आणि चीन या लष्करी कवायतीतून काय साध्य करू इच्छितो असे प्रश्‍न निर्माण होतात. गत आठवड्यात चीनच्या लष्कराने तैवानभोवती केलेल्या लष्करी कवायतींचे वर्णन ‘अलिप्ततावादी कारवायांसाठी कठोर शिक्षा’ असे केले आहे. ‘तैवान कोस्ट गार्ड’चे नेमके काय चालले आहे, हे सांगणे कठीण आहे; परंतु चीनने दिलेल्या माहितीवरून असे दिसते, की चीनची ताजी लष्करी कवायत ही आतापर्यंतची सर्वात मोठी लष्करी कवायत आहे.

या वेळी प्रथमच तैवानच्या आखातातील बहुतांश भागांचा समावेश होता. तैवानच्या पूर्व किनार्‍याला लागून असलेला पॅसिफिक महासागराचा मोठा भाग आणि तैवान आणि फिलिपाइन्सला वेगळे करणारी बाशी वाहिनी या सर्व भागाला या लष्करी कवायतीचा फटका बसला. तैवानचे लष्करी तज्ज्ञ चीह चुंग सांगतात, की ही कवायत तैवानला वेढा घालण्यावर केंद्रित होती. जमिनीवरचे सैन्य पाठविणे दूर ठेवून, ही सर्वसमावेशक हल्ल्याची तयारी होती. या लष्करी कवायतीमध्ये तैवानच्या आजूबाजूच्या सर्व बेटांचा समावेश केला होता. त्यावरून असे दिसते, की चीनने सर्व तळ नष्ट करण्याची योजना आखली आहे. या तळावरूनच चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’वर प्रतिहल्ला केला जाऊ शकतो.

चीनने या लष्करी कवायतीला ‘जॉइंट सोर्ड 2024-ए’ असे नाव दिले आहे. ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ तैवानमधील प्रमुख शहरे आणि बंदरांवर हल्ले करू शकते, असे दिसत होते. ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या ईस्टर्न कमांडने एक नाट्यमय व्हिडिओ जारी केला आहे, त्यात जहाजांचा ताफा तैवानच्या दिशेने जात असल्याचे दाखविण्यात आले आहे. ‘गो अहेड’, ‘लॉक इट’ असे शब्द या व्हिडिओमध्ये ऐकू येतात. संपूर्ण तैवान केशरी रंगात हायलाइट केला गेला आहे, म्हणजे त्यावर चीनचे संपूर्ण नियंत्रण आहे, असे दाखविण्यात आले आहे. वस्तुस्थिती तशी नसली, तरी दबावासाठी चीन कोणत्या थराला जातो, हे कळण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. चीनने आणखी एक व्हिडिओ जारी केला आहे, त्यात ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे एक कर्नल राजकीय भाषेत या लष्करी कवायतीचा उद्देश स्पष्ट करत आहेत.

ते म्हणतात, ‘तैवानच्या पूर्वेकडील भागाजवळील समुद्र आणि आकाशात लष्करी सरावासाठी आम्ही दोन ठिकाणे ओळखली आहेत. यामागे ‘तैवान इंडिपेंडन्स’ फुटीरतावाद्यांना पळून जाण्यापासून रोखणे आणि त्यांना त्यांच्या ताब्यात ठेवणे हा उद्देश आहे.’ तैवानचा पूर्व किनारा लष्करी पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. जपानच्या दक्षिणेकडील बेटांच्या समीपतेमुळे पूर्व किनारपट्टी हा अमेरिकेसह तैवानच्या मित्र राष्ट्रांसाठी एक विश्‍वासार्ह पुनर्पुरवठा मार्ग आहे; पण वास्तविक परिस्थिती इतकी सोपी दिसत नाही. चीनने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, त्यांची तटरक्षक जहाजे तैवानच्या ताब्यात असलेल्या ‘वू-किउ’ बेटाच्या तीन नॉटिकल मैलांच्या त्रिज्येकडे जाताना दिसत आहेत. चीनच्या फुजियान प्रांताच्या किनार्‍यालगतच्या या लहानशा खडकाळ बेटावर सागरी पक्ष्यांचे घरटे तसेच तैवान सैनिकांच्या छोट्या तुकडीची छावणी आहे.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले, की 49 चिनी लढाऊ विमाने, 19 नौदल जहाजे आणि 7 तटरक्षक जहाजे तैवानच्या सागरी क्षेत्राजवळ पोहोचली आहेत. या ताफ्यात हलकी शस्त्र वाहून नेणारी लहान आकाराची युद्धनौका होती. चीनला हल्ला करायचा असेल, तर त्याला खूप मोठ्या जहाजांची आवश्यकता असेल आणि तीही मोठ्या संख्येने. तैवानजवळ 1944 मध्ये एक मोठा हल्ला झाला होता. जपानमधील ओकिनावा येथे अमेरिकेने आक्रमण केले होते. अमेरिकेच्या ताफ्यात 11 युद्धनौका आणि शेकडो सैनिकांसह सुमारे 300 नौसैनिक होते.

तैवानच्या अध्यक्षपदी विल्यम लाई निवडून आल्यापासून चीनने त्यांच्या विरोधात चिनी माध्यमांमध्ये आघाडी उघडली आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ने त्यांचे वर्णन ‘अहंकारी’ आणि ‘बेपर्वा’ असे केले आहे. द्विराष्ट्र सिद्धांताचे समर्थन केल्याबद्दल चिनी वाहिनीने त्यांच्याविषयी खालच्या पातळीवरची आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. विल्यम लाई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात चीनचा उल्लेख करून ते स्वतंत्र राष्ट्र असल्याचे म्हटले. त्यामुळे चीनचे पित्त खवळले आहे. जगातील कोणतेही सैन्य इतक्या अल्प काळात एवढ्या मोठ्या लष्करी कवायती करू शकत नाही.

आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे चिनी सैन्याने समुद्रात वारंवार मध्यरेषा ओलांडली आहे. मध्य रेखा ही चीन आणि तैवानच्या किनार्‍यापासून सुमारे 50 नॉटिकल मैल अंतरावर असलेली एक रेषा आहे. ती दोघांमधील अनधिकृत सीमा म्हणतात; परंतु चीनने अद्याप तैवानच्या 24 मैलांच्या रेषेचा भंग केलेला नाही. आक्रमक होऊनही चीन अजूनही खबरदारी घेत असल्याचे दिसते. तैवानमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संसदेत जोरदार वादावादी सुरू आहे; मात्र चीनच्या लष्करी सरावाने देशातील सर्व पक्षांना एकत्र केले आहे. या पार्श्‍वभूमीवर तैवाननेही युद्धाची तयारी सुरू केली आहे. तैवानचे लोक चीनसोबतच्या संभाव्य युद्धासाठी स्वत: प्रशिक्षण घेत आहेत. बनावट क्षेपणास्त्रांचा स्फोट करण्यापासून ते जखमी लोकांना मदत करण्यापर्यंत युद्धादरम्यान घडणार्‍या प्रत्येक गोष्टीची ते तयारी करत आहेत. कारण चीन आता तैवानवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

चीनच्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर तैवानचे लोक युद्धपातळीवर स्वसंरक्षणाची तयारी करीत आहेत. या वर्षी जानेवारीच्या उत्तरार्धात, कुमा अकादमी या नागरी संरक्षण गटानेही अशाच प्रकारचे सराव केले होते. यामध्ये क्षेपणास्त्र हल्ल्याला कसे सामोरे जायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. कुमा अकादमीचे प्रशिक्षक चेन यिंग म्हणतात, की आज आम्ही मोठ्या प्रमाणावर सराव केला. यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव देण्यासाठी आम्ही एक वास्तविक युद्धभूमी तयार करतो, जेणेकरून येऊ शकणार्‍या आपत्तींना कसे सामोरे जावे हे शिकू शकतील. कुमा अकादमीची अलीकडच्या वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे आणि आता सायबर हल्ले आणि डिसइन्फॉर्मेशनपासून ते कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) आणि दुखापतीचे मूल्यांकन या विषयांवर विविध प्रकारचे अभ्यासक्रम आणि व्यायाम करून घेतले जातात.

युद्धक्षेत्रावर संयुक्तपणे नियंत्रण ठेवण्यासाठी, संयुक्त हल्ले सुरू करण्यासाठी आणि गंभीर क्षेत्रांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कमांडच्या क्षमतेची चाचणी घेण्यासाठी बेटांच्या आत आणि बाहेर एकात्मिक ऑपरेशन सुरू केले गेले. तैपेई येथील सूचो विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक फँग-यू चेन यांच्या मते, चीनच्या चिंतेमुळे नागरी संरक्षणाची सर्व तयारी केली जात आहे. तैवानच्या लोकांना चीनच्या आक्रमक कृतींबद्दल चिंता आहे.