अतुल गोगावले उलगडणार भारतरत्नांची यशोगाथा

संगीतकार, गीतकार, तालवादक, पार्श्वगायक अशी ओळख असलेले अजय – अतुल या प्रख्यात संगीतकार जोडीतील अतुल गोगावले आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. सातत्याने नवनवीन प्रयोग करत, स्वतःला आजमावत या संगीतकार जोडीने मराठीसह बॉलीवूड मध्येही आपली अमिट छाप निर्माण केली आहे. विविध कॉन्सर्ट मध्ये आपल्या गाण्याने, तालवादनाने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगीतकाराच्या बहारदार अशा भूमिकेतून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे अतुल गोगावले आता छोट्या पडद्यावर सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून महाराष्ट्रातील भारतरत्नांची यशोगाथा उलगडणार आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनी वर प्रजासत्ताक दिनापासून ‘आपले भारतरत्न’ हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या विषयी बोलताना अतुल गोगावले म्हणाले, एखाद्या संगीत विषयक कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन करणार का ? असे न विचारता एबीपी माझाने, एका महत्त्वपूर्ण विषयावरच्या कार्यक्रमासाठी विचारणा केली हीच बाब माझ्यासाठी फार सकारात्मक आणि आव्हानात्मक आहे. या कार्यक्रमातून आम्ही महाराष्ट्र जन्मभूमी किंवा कर्मभूमी असलेल्या ९ भारतरत्नांची यशोगाथा महाराष्ट्रातील जनतेसमोर घेऊन येत आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य विनोबा भावे, महर्षी धोंडो केशव कर्वे, जेआरडी टाटा, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, गानकोकिळा लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, नानाजी देशमुख, पांडुरंग काणे या सर्वांची नावं माहित असली तरी त्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती अनेकांना नाही, ती देण्याचा प्रयत्न ‘आपले भारतरत्न’ या मालिकेतून करण्यात आला आहे. भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानीत झालेल्या अभिवंदनीय व्यक्तीमत्त्वात महाराष्ट्रातील व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे, त्यांची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला देणाऱ्या कार्यक्रमाचा भाग मला होता आले याचा खूप आनंद वाटतो असेही अतुल गोगावले यांनी सांगितले.
एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर म्हणाले, ‘आपले भारतरत्न’ या कार्यक्रमातून आम्ही ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानीत व्यक्तींच्या आठवणी जागवत त्यांना अभिवादन करणार आहोत, तसेच नव्या पिढीपर्यंत त्यांना पोहोचविणे हा या मालिकेचा हेतू आहे, ही ९ भागांची मालिका आहे. अतुल गोगावले यांच्या निवडीबद्दल बोलताना खांडेकर म्हणाले, अजय – अतुल हे मराठी भाषा, संस्कृतीबद्दल अभिमान असलेले सजग, संवेदनशील कलाकार आहेत. त्यांच्या बोलण्यातून या मातीचा अभिमान सदैव जाणवतो. आपल्याकडे सूत्रसंचालन कुणी करायचे याच्या बद्दलचे ठराविक ठोकताळे आहेत. मात्र सूत्रसंचालक म्हणून नेहमीच्या पठडीतला चेहरा नको असा आमचा हेतू होता. तसेच अतुलच्या बोलण्यातून मराठी भाषा, संस्कृती या बद्दलच्या जाणीवा तीव्र आणि प्रगल्भ असल्याचे दिसते यामुळे आम्ही अतुल यांची निवड केली.

Leave a Comment