मनसे नेते अविनाश जाधवांवर खंडणीचा गुन्हा; सराफाकडे 5 कोटी मागितल्याचा आरोप

Avinash Jadhav | Extortion case – मनसे नेते अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सराफा शैलेश जैन यांच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

सराफाकडे खंडणी मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अविनाथ जाधव यांचे मित्र वैभव ठक्कर यांना हिशोबासाठी सराफाने बोलावले असतना, अविनाश जाधव यांनी तिथे सराफाच्या मुलाला मारहाण केली.

तसेच जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, जैन यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी जाधव यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

तर दुसरीकडे अविनाश जाधव यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. “एका वैभव नावाच्या व्यक्तीने मला कॉल करून मला व माझ्या पत्नीला डांबून ठेवले, असे सांगितले होते. मी त्याला पोलिस नियंत्रण कक्षात कॉल करण्यास सांगितले. त्यानंतर, मी मदतीसाठी पोलिसांसह तेथे गेलो”, असे जाधव यांनी म्हंटले आहे.