पुणे | 125 महाविद्यालयांना टाळे?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नगर, नाशिक व पुण्यातील वरिष्ठ महाविद्यालये संलग्नता शुल्‍क न भरल्‍याच्‍या कारणावरुन अडचणीत सापडणार आहे. वारंवार सूचना देऊन महाविद्यालये विद्यापीठ संलग्नता शुल्‍क व अन्य शैक्षणिक बाबींची पूर्तता करण्यास दुर्लक्ष करीत असल्‍याचे दिसून येत आहे. त्‍या पार्श्वभूमीवर अशी जवळपास १२५ महाविद्यालये शैक्षणिक वर्षापूर्वी बंद करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून पाऊल उचलण्यात येत आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यंदापासून अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. त्‍यादृष्टीने विद्यापीठाकडून प्रयत्‍न सुरू आहेत. मात्र, काही महाविद्यालये सर्व त्रुटींची पूर्तता करीत नसल्‍याचे दिसून येत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता आता विद्यापीठ प्रशासनाकडून या महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्याच्‍या अंतिम टप्‍प्‍यात आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या 783 असून, ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे. मात्र,गेल्या काही वर्षांत 45 हून अधिक महाविद्यालये स्वायत्त झाली आहेत. पण, अशी काही महाविद्यालये आहेत की ज्यांनी विद्यापीठाकडे संलग्नता शुल्कच भरलेले नाही. तसेच संलग्नतेशी संबंधित काही त्रुटी आहेत. त्यामुळे विद्यापीठाने ही महाविद्यालये बंद करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, विद्यापीठाशी संलग्न काही स्वायत्त महाविद्यालयांनी विद्यापीठाचे कोट्यवधी रुपयांचे शुल्क थकवले आहे. त्यामुळे या महाविद्यालयांबाबत उचित कार्यवाही करून थकवलेले शुल्क जमा करून घ्यावे, असा ठराव काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत करण्यात आला होता. त्‍यामुळे स्‍वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचे थकित शुल्‍क भरण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न जिल्हानिहाय महाविद्यालये

पुणे- 453 , अहमदनगर – 149
नाशिक व दादरा नगर हवेली – 181

पुणे विद्यापीठांतर्गत विद्यार्थी
सुमारे 7 लाख 9 हजार