उन्हाळ्यात पित्त कसं रोखावं?

सध्या तापमानाचा पारा चांगलाच चढलेला आहे. प्रत्येकाने आपले आरोग्य आणि स्वास्थ्याबद्दल अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे. जे विचार न करता खान-पान करतात, त्यांच्या स्वास्थ्याला या मोसमात आव्हान निर्माण होतं.

सर्वसाधारणपणे दाह आणि पित्त असे त्रास प्रामुख्याने उन्हाळ्यात होतात. पित्ताची लक्षणं म्हणजे छातीत जळजळ, मुखदरुगधी, तोंड येणं आणि दाह. शरीरात जेव्हा उष्णता वाढते तेव्हा आपलं शरीर उच्चतम पातळीवर आम्लनिर्मिती करतं. अन्नच तुमचे औषध ठरू शकते, म्हणूनच आपण काय खातोय याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचे आहे. यंदाचा उन्हाळा कमीत कमी पित्तकारक कसा ठरेल, यासाठी तुम्हाला आहाराची ओळख करून देत आहोत.

पाणी आणि द्रवपदार्थ –
आपल्या शरीरातील पाणी आणि पीएच पातळी सुयोग्य राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पाणी, शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत, थंड दूध, ताक आदी द्रवपदार्थ जास्तीत जास्त घेतले जाणे महत्त्वाचे आहे. शहाळ्यामुळे नैसर्गिक पद्धतीने मूत्रविसर्जनाचे प्रमाण वाढते. तसेच यात पोटॅशियम आणि खनिजांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे. या घटकांमुळे आपल्या शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळेच शहाळे नियमितपणे घ्यावे.

थंड दूध –
आहारातील थंड दुधाच्या समावेशाने, पोटातील अतिरिक्त आम्ल शोषले जाते. थंड दुधात १ चमचा सब्जा पित्तासाठी अतिशय उपायकारक ठरते.

दही आणि ताक –
उन्हाळा सुसहय़ व्हावा म्हणून प्रामुख्याने हे पदार्थ सुचवले जातातच. या दोन्ही घटकांमध्ये प्रोबायोटिक्स उत्तम प्रमाणात असल्याचे सर्वज्ञात आहे. आपल्या पोटाचे संरक्षण आणि एकुणात पचनक्रिया सुधारण्यास यामुळे मदत होते आणि आपले स्वास्थ चांगले राहते. फळं नैसर्गिक स्तरावर अँटीऑक्सिडंट आहेतच. शिवाय भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजांमुळे ती ऊर्जा निर्मितीही करतात. पाण्याचा समावेश, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबरयुक्त फळे सर्वोत्तम ठरतात आणि खास करून उन्हाळ्यात त्यांचा चांगलाच फायदा होतो. यामुळे फळांचा रस घेण्यापेक्षा उत्तम रसाळ फळ खावे, असा सल्ला आम्ही नेहमीच देतो.

आवळा, पेरू, संत्र आणि लिंबू यासारखी फळे ‘क’ जीवनसत्त्वयुक्त आहेत. थोडीशी आंबट असल्याकारणाने, अनेकांना या फळांमुळे पित्त वाढेल, अशी भीती वाटते. परंतु, ‘क’ जीवनसत्त्वयुक्त असलेली ही फळे पित्तासाठी परिणामकारक ठरतात. शिवाय यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. आंब्यासारखी उन्हाळ्यात मिळणारी फळेही ‘क’ जीवनसत्त्वाने परिपूर्ण आहेत. ताडगोळा, जाम, खरबूज, कलिंगड ही फळेसुद्धा पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे उत्तम स्रेत आहेत. या फळांमुळे शरीरात पाण्याची पातळी राखली जाते. केळे हे फळ पित्तावर औषध म्हणून सर्वसाधारणपणे घरगुती उपायांमध्ये वापरले जाते. उत्तम फायबरच्या समावेशामुळे केळे पित्तमारक ठरते. मोसमी फळे तसेच विविध रंगांची फळे खावीत, असे आम्ही सुचवतो. यामुळे नैसर्गिकस्तरावर अँटीऑक्सिडंटचे फायदे मिळतात आणि शरीराची ऊर्जा क्षमताही वाढीस लागते.

भाज्या –
दुधी, पडवळ, भोपळा, कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाज्या त्यांच्यातील पाण्याचा आणि खनिजांच्या अंशामुळे फायदेशीर ठरतात. शरीराची पाण्याची पातळी राखण्यासाठी काकडी खासकरून उपयुक्त ठरते. सिमला मिरचीमुळेही नैसर्गिक स्तरावर पोटातील आम्लावर परिणाम होतो. उन्हाळ्यात खासकरून वैविध्यपूर्ण सलाड आणि भाज्यांचे गार सूप अशा पदार्थाचा आहारात समावेश करावा.

गूळ –
गूळ या मोसमासाठी चांगला असतो. गुळाचे पाणी तुमच्या पित्तावर आणि पित्ताच्या लक्षणांवर अतिशय परिणामकारक ठरते.

चिमूटभर मीठ घातलेले, तुळशीची पाने असलेलं लिंबूपाणी घोट घोट घेत राहणं, ताजा ऊस खाणं यामुळेही शरीरातील वाढलेले तापमान कमी होत. चहा, कॉफी, मद्य, सोडा इत्यादींच्या अतिरिक्त सेवनामुळे पित्त वाढते आणि दाहसुद्धा होतो. लाल आणि हिरवी मिरची, मिरी यासारखे मसाले, पुदीना आणि चॉकलेट यामुळेही शरीरात आम्लनिर्मिती होते.

Leave a Comment