पुणे जिल्हा | ज्ञानेश्वर जगताप यांना पुरस्कार प्रदान

बारामती, (प्रतिनिधी)- यावर्षीचा महाराणा प्रताप, शिव-शंभू, सुभाषचंद्र बोस युवा गौरव पुरस्कार प्रसिद्ध सूत्रसंचालक ज्ञानेश्वर जगताप यांना देण्यात आला. समाज, साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने विडणी फलटण येथे 1973 रोजी जयहिंद मित्रमंडळ या संस्थेची स्थापना झाली. ज्याला आता 51 वर्षे पूर्ण होत आहेत. सामाज,साहित्य,कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्याची प्रथा 1983 रोजी सुरू झाली ज्याला आता 41 वर्षे पूर्ण होत आहेत.

देशभक्तीची पार्श्वभूमी असणाऱ्या विडणी या गावात या संस्थेच्या माध्यमातून सलग 51 वर्षांपासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ही जयंती साजरी करणाऱ्या संस्था आणि गावांच्या यादीत संस्थेचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. संपूर्ण गाव अतिशय आनंदाने ही जयंती साजरी करते.

सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करत गेली 17 वर्षे एकापेक्षा एक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करत प्रत्येक कार्यक्रमाची उंची वाढविणाऱ्या ज्ञानेश्वर जगताप यांना यावर्षीचा महाराणा प्रताप, शिव-शंभू ,नेताजी सुभाषचंद्र बोस युवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पानिपतकार, जेष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, पोलीस महासंचालक डॉ. बी. जी. शेखर पाटील, सनदी अधिकारी विश्वास भोसले व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.