भयानक! पाकिस्तानमध्ये ‘पिझ्झा’प्रमाणेच AK-47 मिळते घरपोच

इस्लामाबाद – ऑनलाईन पिझ्झा मागवावा इतक्‍या सहजतेने पाकिस्तानात रिव्हॉल्वर मागवले जाऊ शकते आहे. सोशल मीडियावरून कोणीही व्यक्ती आपल्या आवडीचे शस्त्र निवडू शकतो. डिलरला फोन करून त्याची किंमत ठरवू शकतो. त्यानंतर काही दिवसातच हे पार्सल त्या व्यक्तीला घरपोच मिळू शकते. असाप्रकारे संपूर्ण पाकिस्तानात ही शस्त्रांची डिलीव्हरी घरपोच मिळवली जाऊ शकते, अशा आशयाचे एक सनसनाटी वृत्त पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीने अलिकडेच प्रसिद्ध केले आहे.

अशाप्रकारे शस्त्रांची खरेदी अत्यंत गोपनीय पद्धतीने केली जात असावी, असे कोणालाही सहज वाटू शकते. मात्र अशा प्रकारे शस्त्रांची खरेदी करण्यासाठी चक्क फेसबुकची काही पेज तयार केली गेली आहेत. तसेच काही व्हॉटस ऍपचे ग्रुपदेखील तयार केले गेले आहेत. त्यावर या आधुनिक शस्त्रांचे कॅटलॉगही तयार केले गेले आहेत. अशाप्रकारे शस्त्र खरेदी केलेल्या एका व्यक्तीनेच या वृत्तवाहिनीला ही माहिती दिली. खैबर पख्तुन्वामधील दारा आदमखेल येथून कराचीला 38 हजार रुपयांना आपले शस्त्र येत आहे, असे या व्यक्तीने सांगितले. या व्यवहारासाठी कोणताही परवाना लागला नाही आणि संपूर्ण व्यवहार फोनवरच ठरल्याचेही याने सांगितले.

ईजी पैसा नावाच्या ऍपच्या माध्यमातून 10 हजार रुपये आगोदर पाठवले आणि उर्वरित 28 हजार रुपये शस्त्र मिळाल्यानंतर पाठवले जाणार आहेत, असे त्याने सांगितले. कराचीत सर्वात स्वस्तात ही शस्त्रे मिळतात. एक डिलर आणि दुसरा खरेदीदार असे दोघेच या नेटवर्कमध्ये असतात. या नेटवर्कमधून 9 एमएम पिस्तुलपासून एके-47 रायफलपर्यतचे कोणतेही शस्त्र उपलब्ध होऊ शकते, असेही या खरेदीदाराने स्वतःची ओळख उघड न करता सांगितले.