बंदीचा फटका कृषी उद्योगांना

लाखणगांव – सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका तरकारी पिकांबरोबरच कृषी उद्योगांतील विविध व्यवसायांनाही बसला आहे. सध्या अनेक खते, औषधे, बी-बियाणे विक्रीची दुकाने बंद आहेत. तालुक्‍यात शेती संबंधित दुकाने सुरू करण्याचा सरकारचा आदेश असला तरी अनेक दुकानदार करोनाचा धसका घेऊन दुकान बंद ठेवत आहेत. अनेक उच्चशिक्षित तरुणांनी मोठ्या प्रमाणात बॅंकांची कर्ज उचलून कृषी उद्योगांची खते, औषधांची दुकाने सुरू केली आहेत, त्यामुळे लॉकडाऊनचा फटका कृषी उद्योगांना बसला आहे.

शेतातील तरकारी पिकांना बाजारभाव नसल्याने शेतकरीही खते, औषध फवारणीवर होणारा खर्च कमी करीत आहेत. त्यामुळे खते, औषधाच्या दुकानांतील मागणी घटली आहे. आंबेगाव तालुका हा मोठ्या प्रमाणात बागायती असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तरकारी पिके घेतली जातात. मात्र, सध्या करोनाच्या धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे. या परिसरात त्यामुळे खते, औषधांची दुकानेही मोठ्या प्रमाणावर आहेत. तालुक्‍याची अर्थव्यवस्थाही कृषिप्रधान आहे. मात्र, सध्या कृषी मालाला बाजारभाव नसल्याचा परिणाम शेतकऱ्यांवर झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

विहिरी खोदणाऱ्या मजुरांवर गंडांतर
पाइपलाइन बसवणाऱ्या आणि विहीर खोदणाऱ्या मजुरांवर लॉकडाऊनमुळे गडांतर आले आहेण शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील अनेक लोक भूमिहीन असून, त्यांचा शेतीवर रोजगार अवलंबून आहे. अशा लोकांचा रोजगार बुडाल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात मोठ्‌या प्रमाणावर पाइपलाइन, तसेच विहिरी खोदायची कामे केली जातात. या खोदाईसाठी कर्नाटक तसेच मराठवाड्यातील मजूर मोठ्या प्रमाणावर येथे येतात; परंतु सध्या विहीर खोदायची कामे ठप्प आहेत. परराज्यातून आलेल्या मजुरांचा जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला असून उपासमारीची वेळ त्यांच्यावरही आली आहे.

ट्रॅक्‍टर व्यावसायिकांना फटका
ट्रॅक्‍टर व्यावसायिकांचेही लॉकडाऊन काळात बरेच नुकसान झाले आहे. उन्हाळी हंगामात शेतकरी मोठ्‌या प्रमाणावर तरकारी पिके घेतली जातात, त्यामुळे नवीन लागवडीसाठी ट्रॅक्‍टरच्या साह्याने मशागत केली जाते; परंतु सध्या बाजार समित्या बंद असल्याने पिके घेण्याऐवजी शेती तशीच राहू देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असल्याने ट्रॅक्‍टर मालकांच्या व्यावसायावर परिणाम झाल्याचे पाहावयास मिळत आहे. शेतकरी नवीन तरकारी पिके न घेता शेती तशीच मोकळी ठेवत आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेती नांगरून ठेवली आहे आणि तरकारीऐवजी जुलै महिन्यात ऊस लागवड करण्याकडे त्यांचा कल असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment