पॅरा-अ‍ॅथलीट विनोदकुमारवर बंदीचे सावट

नवी दिल्ली – भारताचा पॅरा-अ‍ॅथलीट विनोद कुमार याने दिव्यांग असल्याचे पुरेसे पुरावेच दिले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जपानमध्ये गेल्या वर्षी झालेल्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये थाळी फेक स्पर्धेत (एफ 52 श्रेणी) जिंकलेले ब्रॉंझपदक रोखण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर या संपूर्ण प्रकरणात तो दोषी ठरला तर त्याच्यावर बंदीचीही कारवाई होऊ शकते.

विनोद कुमारने स्वत:च्या शारीरिक व्यंगाबाबत तसेच मर्यादांबाबत चुकीची माहिती दिल्याचे समोर आले आहे. त्याला सध्या दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. जागतिक पॅरा-अ‍ॅथलीट समितीने बोर्ड ऑफ अपील ऑफ क्‍लासिफिकेशनने विनोदवर एकूण दोन वर्षांची बंदी घातली आहे. त्यामुळे त्याला ऑगस्ट 2023 सालापर्यंत कोणत्याही प्रकारच्या पॅरा-ऍथलेटिक्‍स स्पर्धांमध्ये खेळता येणार नाही.

स्पर्धेतील त्याची कामगिरी व त्याचा विशिष्ट गटातील सहभाग यात तफावत आढळून आली आहे. जागतिक पॅरा-ऍथलेटिक्‍सच्या नियमांनुसार एखाद्या खेळाडूने त्याच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण किंवा स्वरूप चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचे उघड झाले, तर त्याच्यावर ही कारवाई केली जाते.

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये विनोदकुमारने थाळीफेक प्रकारात 19.91 मीटर फेक करत ब्रॉंझपदक पटकावले होते. यानंतर लगेचच या निकालांची तपासणी केली गेली होती व त्यात तो अपात्र असतानाही कसा सहभागी होऊ शकला, असा प्रश्‍नही निर्माण झाला होता. त्यानंतर कुमारचे पदक रोखण्यात आले होते. आता याबाबत भारतीय पॅरा-अ‍ॅथलीट संघटना काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.