बाणेर, पाषाण परिसरामध्ये सांडपाण्याने दलदल

बालेवाडी :एफ रेसिडेन्सीसमोर वाहत असलेले सांडपाणी आणि तयार झालेली दलदल.

औंध – बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाइन तुंबल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. हे पाणी रस्त्यावरून ओढ्याप्रमाणे वाहत असल्यामुळे दलदल निर्माण झाली आहे. गेले अनेक महिन्यांपासून ड्रेनेज लाइन तुंबलेल्या अवस्थेत असताना क्षेत्रीय कार्यालयाचे याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांनी संताप व्यक्‍त केला आहे.

बालेवाडीतील एफ रेसिडेन्सीसमोर सांडपाण्याचा ओढा वाहत आहे, हे पाणी आसपासच्या रहिवासी इमारतींमध्ये शिरत आहे. इमारतीचे पार्किंग तसेच मोकळ्या जागेत हे सांडपाणी साचून दुर्गंधी पसरत आहे, यातून डास तसेच अन्य उपद्रवी किटकांमुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.

बाणेर जुपिटर हॉस्पिटल रोडवर हरीलीला सोसायटीसमोरील रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे. हे पाणी परिसरातील बैठ्याघरांमधे शिरत आहे, अशीच अवस्था पाषाण परिसरातही आहे, सोमेश्‍वरवाडी साईनगरमध्येही रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे. सुतारवाडीतील मनपा शाळेच्या मागेही अनेक महिन्यांपासून सांडपाणी साचून राहत आहे. पाषाण परिसरातील रिलीफ मेडीकल (म.न.से मेडीकल) समोर देखील रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे.

ड्रेनेज लाइनच्या तक्रारी आल्यावर कर्मचाऱ्यांमार्फत काम करून घेण्यात येते. परंतु, काही ठिकाणी काम करण्यास निधीची आवश्‍यकता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही कामे निधी अभावी रखडून राहिलेली आहेत. येत्या आठवडाभरात महानगरपालिके कडून या कामांसाठी निधी उपलब्ध होत आहे. – गिरीश दापकेकर, सहायक आयुक्‍त, औंध क्षेत्रीय कार्यालय