Ganpati utsav 2023 : सुबोध भावेच्या घरी बाप्पाचे आगमन; गणपतीसाठी केला ‘चांद्रयान 3’चा देखावा

पुणे – घरोघरी गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले आहे. मराठमोळा अभिनेता सुबोध भावेच्या घरी देखील गणपतीचे आगमन झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पासाठी केलेल्या देखाव्याची चर्चा आह. यंदा गणपतीसाठी त्याच्या मुलांनी बाप्पासाठी खास ‘चांद्रयान3’ चा देखावा तयार केला आहे. नुकतेच याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, भारताने मोठी कामगिरी करत चंद्रयान 3 चे यशस्वी रित्या प्रेक्षपण केले. या ऐतिहासिक क्षणाचा देखावा यंदा सुबोध भावेच्या घरी बाप्पासाठी साकारण्यात आला आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये गणपतीची सुंदर मूर्ती दिसत असून त्याच्यामागे पाठी छान मखर लावलं आहे. तर मूर्ती शेजारी चांद्रयान तयार करून ठेवण्यात आलं आहे. तर त्याशेजारी चंद्रही तयार करण्यात आला आहे. त्यावर चांद्रयान जिथे उतरलं तिथे शिव शक्ती पॉइंट असं नाव देण्यात आलं आहे. देवासमोर छानसे दिवे लावण्यात आले आहेत. तर दुसऱ्या फोटोत सुबोधची मुले बाप्पासोबत फोटो काढताना दिसत आहे. त्यांचा हा देखावा नेटकऱ्यांचीही पसंतीस पडला असून अनेकजण त्यांचे कौतुक करत आहेत.

सुबोध भावेने इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “गणपती बाप्पा मोरया… यंदाच्या वर्षी आमच्या घरी मुलांनी सादर केलेला देखावा “चांद्रयान 3″श्री गणेश आपल्या सर्वाना उत्तम आयुष्य, आरोग्य देवो हीच श्रीचरणी प्रार्थना.” यावर नेटकऱ्यांनीही कमेंट करत ‘वाह..खूप सुंदर,’ खूप चांगली संकल्पना आहे.’ असे लिहिले आहे. दरम्यान, मागील वर्षी त्याने निसर्ग जपण्याचे महत्त्व सांगणारा देखावा केला होता.