बारामती | जरंडेश्वर कारखान्याचे मालक कोण ? अजित पवार उत्तर द्या..! – किरीट सोमय्या

बारामती (प्रतिनिधी) : जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड शेतकऱ्यांच्या हातातून स्वतःच्या ताब्यात घेणारे जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. कंपनी कुणाची ? यांचे उत्तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्यावे अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

बारामती येथील आयोजित पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश, बेगडे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे,बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, शहराध्यक्ष सतीश फाळके, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे आदी मान्यवर उपस्थित होते.

ते म्हणाले, जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड म्हणजे जरंडेश्वर एस. एस. के. लिमिटेड हा शेतकऱ्यांचा कारखाना आता आजीवन लीजवर जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. या कंपनीला देण्यात आला आहे. पवार साहेबांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना सारखेच जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. नाव ठेवलं, शेतकऱ्यांमध्ये, लोकांमध्ये भ्रम निर्माण पैदा करण्याची ही चाल आहे.

मुळातच जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा कारखाना तो डबघाईस निघतो. तो अपारदर्शकरित्या, अगदी कमी किंमतीत अजित पवारांची बेनामी कंपनी गुरु कमोडिटी सर्विस प्रा. लि. यांना विकला जातो. गुरु कमोडिटी सर्विसेस प्रा. लि. ला यासाठी लागणारे 65 कोटी रुपये हे अजित पवारच मागच्या दारातून उपलब्ध करून दिले असा आरोप त्यांनी यावेळी केला.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मूळ मालक, शेतकरी जे भागधारक आहेत, ज्यांनी जमीनीही दिल्या आहेत, पैसे ही दिले आणि साखर कारखाना आता पवार परिवाराच्या मालकीचा होतो. आज या मूळ शेतकऱ्यांनी आपली व्यथा, वेदना ही माझ्या समोर मांडली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवा. महाराष्ट्रात असे अनेक साखर कारखाने फसवणुकीने शेतकऱ्यांच्या ताब्यातून काढून फसवणुकीनी नेत्यांनी ताब्यात घेतले आहेत.

कारखाना ताब्यात घेतल्यानंतर गुरु कमोडिटी सर्विसेस प्रा. लि. ही पवारांची आणखीन एक कंपनी जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा.लि. यांना आजीवन लीजवर हा कारखाना देत ही लपवाछपवी शेतकऱ्यांची मूळ सभासदांची फसवणूक करण्यासाठी करण्यात आली. जरंडेश्वर शुगर प्रा. लि. कंपनीच्या डायरेक्टरचे नाव आहे राजेंद्र घाडगे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना विकत घेताना गुरु कमोडिटी सर्विसेस प्रा. लि. ला स्पार्कलिंग सॉईल प्रा. लि. कंपनीने 20 कोटी रुपये दिले. म्हणजेच राजेंद्र घाडगे हे अजित पवार यांचे सहकारी असल्याचे सांगत. ते म्हणाले, बेनामी कंपन्याद्वारा अशाप्रकाराने स्वतः ची संपत्ती निर्माण करणाऱ्या या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणात गुरु कमोडिटी सर्विसेस प्रा. लि., स्पार्कलिंग सॉईल प्रा. लि. जय ॲग्रोटेक प्रा. लि. ओंकार रियाल्टर्स अँड डेव्हलपर्स आणि मेसर्स शिवालिक बिल्डर्स जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. या सगळ्यांच्या एकमेकांशी, अजित पवार यांच्याशी संबंध व भूमिकांची चौकशी व्हायला हवी.