बार्टीची स्पर्धा चाळणी परीक्षा पुढे ढकलली

पुणे – करोनाच्या प्रादुर्भावामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी)च्या वतीने स्पर्धा परीक्षांकरिता आयोजित चाळणी परीक्षा पुढे ढकलली आहे. करोनाबाबतची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर या परीक्षेची तारीख कळविण्यात येणार आहे. बार्टीच्या वतीने याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता एलआयसी, रेल्वे, बॅंक या आस्थापनांमधील लिपिक वर्गातील भरतीच्या मार्गदर्शनाकरिता नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग) दिले जाते. त्याकरिता 29 फेब्रुवारीला जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार 19 मार्च अर्ज करण्याची शेवटची तारिख होती; तर 22 मार्चला चाळणी परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

मात्र, राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून अनेक नागरिकांनी एकाच ठिकाणी येण्यास मनाई केली आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेले आवाहन लक्षात घेता, बार्टी प्रशासनाच्या वतीने ही नियोजित चाळणी परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेची नवीन तारीख परीक्षार्थिंना कळविण्यात येईल, अशी माहिती बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी दिली.

Leave a Comment