योद्धयांची लढाई अपयशी! देशात २४ तासांत करोनामुळे तब्बल ‘एवढ्या’ डॉक्टरांचा मृत्यू

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाच्या सर्वच यंत्रणांना पोखरून टाकल्याचे दिसत आहे.  करोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी दिवसरात्र  लढणाऱ्या डॉक्टरांनाही याचा मोठ्या प्रमाणात फटका  बसला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या दुसऱ्या लाटेत २४४ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. रविवारी ५० डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सर्वाधिक मृत्यू बिहार (६९), उत्तर प्रदेश (३४) आणि दिल्लीत (२७) झाले आहेत. यापैकी फक्त तीन टक्के डॉक्टरांचं लसीकरण झाले होते. करोना रुग्णांसाठी काम करणाऱ्या दिल्लीमधील गुरु तेग बहादूर रुग्णालयातील २६ वर्षीय डॉक्टर अनस मुजाहिदला करोनामुळेच आपला जीव गमवावा लागला. करोनाची लागण झाल्यानंतर काही तासांतच त्याचे निधन झाले.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत जीव गमावणाऱ्या २४४ डॉक्टरांमधील अनस सर्वात तरुण डॉक्टर आहे. पहिल्या लाटेत गेल्यावर्षी ७३६ डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत देशभरात करोनामुळे जवळपास एक हजार डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अनसच्या मृत्यूनंतर त्याचा मित्र आणि सहकारी डॉक्टर आमीर सोहेलला मोठा धक्का बसला आहे. अनसला घसा दुखणे अशी काही मध्यम लक्षणं जाणवत होती. रुग्णालयात चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. काही वेळातच अनस खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचं लसीकरण झालं नव्हतं. “हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. त्याला कोणतीही व्याधी नव्हती. तसंच आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या नसल्याचं त्याच्या कुटुंबाने सांगितलं आहे.

देशात लसीकरण मोहीम सुरु होऊन पाच महिने झाले आहेत. मात्र अद्यापही ६६ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. डॉक्टरांनी लस घ्यावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे  इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर जयेश लेले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या  माहितीनुसार, “रविवारी ५० डॉक्टरांचा मृत्यू आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २४४ डॉक्टरांनी जीव गमावणं आमच्यासाठी खूप दुर्दैवी आहे”.

“डॉक्टरांची संख्या कमी असून त्यांच्यावर प्रचंड ताण आहे. कधी कधी तर विश्रांती न घेता ते सलग ४८ तास काम करतात. यामुळे त्यांच्या त्रासात भर पडत असून लागण झाल्यानंतर मृत्यू होत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांचे  मनोबल वाढवण्यासाठी सरकारने उपाययोजना करणे  गरजेचे  आहे,” असेही त्यांनी सांगितले आहे.