बावधनमध्ये खाेदकाम अपूर्णच, रस्ते दुरुस्तीचे ‘वावडे’

कोथरूड  – केबल, पाइपलाइन टाकण्यासाठी रस्त्याबाजूला कंपन्यांकडून खोदकाम केले जाते. मात्र, ते काम वेळेत पूर्ण करून आणि खड्डे तात्काळ बुजवून रस्ता व्यवस्थित करण्यात या कंपन्यांना “वावडे’च असल्याचे दिसून येते. मग ते शहरातील रस्ते असो, किंवा महामार्गालगतचे सेवा रस्ते. बावधन येथील सेवा रस्त्यावर खोदकाम करून पंधरा दिवस झाले, तरी त्याचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे याठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होत आहे.

 

 

बावधन येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेला सेवा रस्ता, (महामार्ग पोलीस मुख्यालयाबाहेर) मागील पंधरा दिवसांपासून खोदून ठेवण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूने पाइपचे मोठे रोल आणून टाकण्यात आले आहे.

 

 

आधीच हा रस्ता अरुंद, त्यात सकाळ-संध्याकाळ या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ अधिक असते. असा परिस्थिती खोदकाम केल्यामुळे एकच वाहन जाईल एवढी जागा राहिली. त्यामुळे दररोज याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

 

 

याबाबत बावधन ग्रामपंचायतीचे सदस्य व शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन दगडे म्हणाले, “या खोदकाम वाहतूक कोंडी होते, तर पादचारी नागरिकांनी रस्त्याने व्यवस्थित चालता येत नाही. त्यामुळे ग्रामसेवकाला याबाबत विचारणा करून, तात्काळ काम मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. परंतू, ते काम ग्रामपंचायतीकडून सुरू नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित विभागाशी संपर्क साधून वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हे काम तात्काळ पूर्ण करावे, अन्यथा स्वत: खड्डे बजवून संबंधित ठेकेदारविरोधात तक्रार देण्यात येईल,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Comment