नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हा

पिंपरी  – ऑनलाइन शिक्षणाचे मूल्य विशेषतः कोविड काळात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ केवळ शिक्षणातील उत्कृष्टतेसाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी समर्पित असलेली संस्था आहे. या संस्थेतील कुशल प्राध्यापकांकडून योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळाल्याने येथून शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरी शोधणारे बनण्याऐवजी नोकरी देणारे बनतील, असे प्रतिपादन केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, सेंटर फॉर ऑनलाइन लर्निंग विभागाच्या वतीने दीक्षाआरंभ सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल ऑनलाईन माध्यमातून प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, विश्‍वस्त आणि कार्यकारी संचालक स्मिता जाधव, तसेच डॉ. सफिया फारुकी उपस्थित होते.

कुलपती – डॉ. पी. डी. पाटील म्हणाले की, सेंटर फॉर ऑनलाइन लर्निंगमधील ऑनलाइन एमबीए आणि बीबीए कोर्सचा सर्वात चांगला भाग म्हणजे शिक्षण घेणारे जगभरातून कोठूनही त्यांच्या स्वत:च्या वेळेप्रमाणे आणि वेगाने अभ्यास करू शकतात. येथे कॅम्पसमध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना कल्पकतेने विचार करण्यासाठी, नवनवीन शोध घेण्यासाठी दर्जेदार शिक्षण प्रदान करण्याची खात्री देतो.