काळजी घ्या ! कोरोना वाढतोय.. केरळ पाठोपाठ ‘या’ राज्यामध्ये वाढले रुग्ण..

नवी दिल्ली – देशात करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून केरळ आणि कर्नाटकमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या तुलनेने खूप जास्त प्रमाणात वाढली असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

गेल्या २४ तासात एकूण ४२३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी २६६ रुग्ण केरळमधील आहेत, तर शेजारील कर्नाटकमध्ये ७० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशभरात करोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ३,४२० इतकी आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

मात्र जरी करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यामुळे अस्वस्थ होण्याचे कारण नाही. कारण हा व्हेरिएंट घातक नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेचे माजी प्रमुख संशोधक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे. मात्र तरिही नागरिकांनी सतर्क रहावे आणि प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी, असेही त्यांनी सुचवले आहे.

जेएन-१ हा व्हेरिएंट किती घातक आहे. यामुळे केवळ न्युमोनिया होऊ शकतो का पूर्वीच्या बीए २.८६ व्हेरिएंटप्रमाणे हा प्राणघातक आहे, याचा डाटा सध्या उपलब्ध नाही. मात्र सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यांनुसार जेएन१ हा व्हेरिएंटचा धोका खूपच कमी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.