खबरदारी बाळगा! देशात करोनाच्या रुग्णांमध्ये किंचितशी घट ; १६३ नव्या बाधितांची नोंद

नवी दिल्ली : भारतातील करोनाचा प्रादुर्भाव घटताना दिसत आहे. देशात आज 163 नवे करोनाचे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी ही संख्या 214 होती त्यामुळे आज रुग्ण संख्येत 51 रुग्णांची घट झाली आहे. देशात सध्या ओमायक्रॉनच्या XBB व्हेरियंटचे सात, BF.7 व्हेरियंटचे पाच आणि BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आहेत.

देशात करोनाचा संसर्ग घटताना दिसत आहे मात्र धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. करोना विषाणूच्या ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटमुळे अमेरिका आणि चीनमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात करोनाचे नवीन रुग्ण आढळले असले, तरी येथील परिस्थिती दिलासादायक आहे. देशातील संसर्ग दिवसेंदिवस कमी होत आहे.

देशात सध्या करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या XBB सब-व्हेरियंट, BF.7 व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. याशिवाय BQ.1.1 व्हेरियंटचाही देशात शिरकाव झाला आहे. देशात BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आहेत. सध्या ओमायक्रॉनच्या XBB व्हेरियंटचे सात, BF.7 व्हेरियंटचे पाच रुग्ण आहेत.

रिपोर्टनुसार, करोना रुग्णांमध्ये मागील काही महिन्यामध्ये आढळलेल्या खालील प्रमाणे लक्षणे दिसून आली. यामध्ये काही लक्षणे पूर्वीप्रमाणे सारखीच होती, तर काही लक्षणे नवीन असल्याचे दिसून येत आहे. घसा खवखवणे, डोकेदुखी, पाठदुखी, कंबर दुखी, अंगदुखी, नाक वाहणे, थकवा येणे, शिंका येणे, रात्री घाम येणे ही नवीन लक्षणे आढळली आहेत.