nagar | कर्मचारी नियुक्तीचा पॅर्टन ठरला

नगर, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अधिकारी-कर्मचारी नियुक्तीचा पॅर्टन ठरला आहे. मतदान प्रक्रियेसाठी ज्यांची नियुक्ती झाली आहे, ते रहिवासी असलेला मूळ तालुका आणि सध्या कार्यरत असलेल्या तालुक्याव्यतिरिक्त अन्य तालुक्यात नियुक्ती केली जाणार आहे.

अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी येत्या १३ मे रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात ३ हजार ७३४ मतदान केंद्र आहेत. एका मतदान केंद्रावर ५ कर्मचारी आणि एक पोलीस, अशा सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती राहणार आहे. त्याशिवाय १० टक्के कर्मचारी राखीव राहणार आहेत. जिल्ह्यात १८ हजार ६७० कर्मचारी लागणार आहेत.

या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी ‘पोलिंग स्टॉप मॅनेजमेंट’ या ॲपद्वारे केली जाणार आहे. अधिकारी आणि कर्मचारी हे कोणत्या तालुक्यातील रहिवासी आहेत आणि सध्या कार्यरत असलेला तालुका यांची नोंद ॲपवर घेतली जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांत निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी नियुक्ती होणार नाही.

विधानसभा मतदार संघानिहाय नियुक्त केलेल्या सहायक निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत मतदानाच्या एक दिवस अगोदर मतदान साहित्य दिले जाणार आहे. एसटी महामंडळाच्या बस, खासगी स्कूल बस आणि अधिग्रहित केलेल्या वाहनांतून मतदान केंद्रांवर सायंकाळीच मतदानासाठी जावे लागणार आहे.

पडताळणीनंतर होणार मतदान
मतदान हे सोमवारी (दि.१३) सकाळी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष ईव्हीएम मशिनची जोडणी आणि पडताळणी करून मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे.