अहमदनगर – ममदापूर येथे गोमांस व जिवंत जनावरे पकडली; १२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात

श्रीरामपूर – श्रीरामपूरजवळील ममदापूर येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून गोमांस व जिवंत जनावरे, असा सुमारे १२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे, तर सहा जण फरार झाले आहे

गुन्हे शाखेच्या पथकाने ममदापूर येथे छापा टाकला असता, घराजवळ असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये ८ जण गोवंशीय जनावरांची कत्तल करताना दिसून आले. त्यावेळी पथक शेडचे गेट उघडताना गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे भिंतीवरून उड्या मारून पळून जाऊ लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करून तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. उर्वरीत अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. ताब्यात घेण्यात आलेल्या इरफान शेरखान पठाण (वय २४), अनिस नुरा पठाण (वय ३३), जावेद नाजु शेख (वय ३५) यांना ताब्यात घेतले.

अदिल सादिक कुरेशी, नाजीम आयुब कुरेशी, वसीम हनीफ कुरेशी, आरिफ अमीर कुरेशी, शोएब बुडन कुरेशी (सर्व रा. ममदापूर) आदी फरार झाले आहेत. कत्तलीसाठी आणलेली जनावरे ही अल्ताफ जलाल शेख याचे घरालगत आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेले आहे. तो तसेच सुरेश लक्ष्मण खरात व मुम्तजील मुनीर कुरेशी हे कत्तलीसाठी जनावरे आणून देतात, असे सांगितल्याने पथकाने अल्ताफ जलाल शेख याचे घराचे मागील बाजूस असलेल्या पत्र्याचे शेडमधून दोघे सुरेश लक्ष्मण खरात (वय ३९), अल्ताफ जलाल शेख (वय २२) ताब्यात घेतले. मुम्तजील मुनीर कुरेशी फरार झाला आहे. ताब्यात घेतलेल्या जणांकडून ९ लाख ९० हजार रुपये किंमतीचे ३ हजार ३०० किलो गोमांस व २ लाख ५० हजार रुपये किमतीची ५० गोवंशीय लहान जनावरे व इतर असा एकूण १२ लाख ५५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.