पेरु खाण्याचे फायदे माहित आहेत का?

पेरू हे आपल्यातील अनेकांचं आवडतं फळ आहे. काहींना कडक तर काहींना अगदी पिकलेले पेरू खायला आवडतात. काहींना मात्र पेरू खाल्ल्यावर पोटदुखीचा त्रास होतो. हा त्रास खरं तर पेरूमुळे नाही, तर पेरुतील बियांमुळे होतो. ज्यांना हा त्रास होत असेल त्यांनी पेरुच्या बिया काढून केवळ मांसल भाग खाणे फायद्याचे ठरते.

पेरू या फळात जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात असतात. म्हणून हे फळ खाणे त्वचा आणि केस या दोहोंवरही चांगले परिणाम करते. फॉलिक अॅसिड, पोटॅशिअम, तांबे आणि मँगनीज हे धातू पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. यामुळेच सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या अनेक कंपन्या पेरुचा वापर त्यांच्या उत्पादनात करतात. पेरू सात्त्विक गुणधर्माचा व बुद्धिवर्धक असल्याने बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तीने पेरू खाल्ला असता मानसिक थकवा दूर होऊन ऊर्जा प्राप्त होते.

दुपारी जेवणानंतर पेरू खाणे अत्यंत उपयुक्त ठरते. यामध्ये असणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वामुळे तसेच ग्लुकोज, टॅनिन अ‍ॅसिड या घटकांमुळे जेवण सहजरीत्या पचते. सहसा पेरू खाताना त्यावर संधव व जिरे मिरे पूड घालून खावे.

यामुळे पेरूमध्ये असणारे कफकारक व वातकारक गुण दूर होऊन पेरू बाधत नाही. पिकलेल्या पेरूची भाजी करून खाता येते. तसेच पेरूचा जाम, कोिशबीर, चटणी, रायते व मुरंबाही करता येतो. हे सर्व पदार्थ रुचीकारक असल्यामुळे अरुची, भूक मंदावणे, आम्लपित्त या विकारांवर पेरूचे विविध प्रकार करून खावेत.

Leave a Comment