कोरेगाव भीमात पोलिसांनी पकडलेल्या “त्या’ तिघांना एक वर्ष कारावासाची शिक्षा

शिक्रापूर –  कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे १० ऑक्टोबर २०२१ रोजी पहाटेच्या सुमारास चोरी करण्यासाठी आलेल्या तिघा सराईतांना शिक्रापूर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने हत्यारासह पकडत जेरबंद केले होते. या गुन्ह्यातील हुकुमसिंग रामसिंग कल्याणी, लखनसिंग राजपूत सिंग व रवीसिंग श्यामसिंग कल्याणी या तिघांना शिरूर न्यायालयाने एक वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी माहिती दिली आहे.

कोरेगाव भीमा येथे १० ऑक्टोबर ला पहाटेच्या सुमारास आनंद पार्क सोसायटी मधील सुधाकर ढेरंगे यांच्या बिल्डींगमध्ये चोर आल्याचे येथील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना माहिती दिली. त्यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलीस नाईक जयराज देवकर, किशोर शिवणकर, अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, रोहिदास पारखे यांनी तेथे जात येथील खंडेराव चकोर, प्रत्युघ्न शिंदे, सुरज मांजरे, सारंग चकोर, निहाल गव्हाणे यांच्या मदतीने संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे काही हत्यारे मिळून आले. त्यांनी चोरी करण्यासाठी आल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्यांच्याजवळील काही हत्यारे, कार जप्त केली. याप्रकरणी हुकुमसिंग रामसिंग कल्याणी (वय ३० वर्षे), रवीसिंग श्यामसिंग कल्याणी (वय २२ वर्षे, दोघे रा. रामटेकडी, मारुती शोरूम जवळ, सोलापूर रोड, हडपसर पुणे, लखनसिंग राजपूत सिंग (वय ३१ वर्षे रा. आनंद हायस्कूल जवळ, हडपसर, पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत तिघांना अटक केली. तिघा आरोपींवर तब्बल वीस हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे हे करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे व पोलीस हवालदार हरिभाऊ चव्हाण यांनी योग्य पुरावे व साक्षीदार शिरूर न्यायालयात मांडले असता शिरूर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी पि. के. करवंदे यांनी तिघांना एक वर्ष सक्षम कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.