भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण: हनी बाबूंनी जामीन याचिका घेतली मागे, मुंबई हाय कोर्टात जाणार

नवी दिल्ली – भीमा कोरेगाव प्रकरणातील एक आरोपी हनी बाबू यांनी शुक्रवारी सुप्रीम कोर्टातील आपला जामीन अर्ज मागे घेतला. ते आता जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करणार आहेत. दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांच्यावर माओवाद्यांशी कथित संबंध असल्याचा आरोप आहे. त्यांनी या प्रकरणी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

त्यावर न्यायमूर्ती बेला त्रिवेदी व न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार होती. पण या प्रकरणी 6 आरोपींना जामीन मंजूर झाल्यामुळे परिस्थिती बदलल्याचे नमूद करत त्यांनी शुक्रवारी आपली याचिका मागे घेतली.

हनी बाबू यांना जुलै 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. सध्या ते नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहेत. हे प्रकरण 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवारवाड्यात आयोजित एल्गार परिषदेतील प्रक्षोभक भाषणांशी संबंधित आहे. या परिषदेनंतर दुसऱ्या दिवशी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा युद्ध स्मारकाजवळ हिंसाचार भडकल्याचा पोलिसांचा दावा आहे.