Israel’s war on Gaza | शांतता करार पाळण्‍याचे बायडेन यांचे हमासला आवाहन; ६ आठवड्याचा ३ टप्प्यांचा प्रस्ताव

Israel’s war on Gaza – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मांडलेल्या शांतता कराराचा मसुदा ताबडतोब स्वीकारावा, असे आवाहन हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायली नागरिकांच्या नातेवाईकांनी हमासला केले आहे. गेल्या ८ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध समाप्त करावे आणि ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांना त्वरित मुक्त करावे, अशी मागणी या इस्रायली नागरिकांनी हमासकडे केली आहे.

बायडेन यांनी ३ टप्प्यांच्या शांतता कराराची रुपरेषा मांडली असून हा मसुदा इस्रायलने हमासपुढे मांडला आहे. हमास आता कोणताही मोठा हल्ला करण्याच्या क्षमतेत राहिलेला नाही. आता इस्रायल आणि हमासने मिळून शांतता करार स्वीकारावा आणि हमासने ओलीस ठेवलेल्या १०० इस्रायलींची सुटका करावी, असे बायडेन यांनी म्हटले आहे.

तीन भागांच्या प्रस्तावाची सुरुवात सहा आठवड्यांच्या युद्धविरामाने होईल. यामध्ये इस्रायली संरक्षण दल गाझामधील लोकसंख्या असलेल्या भागातून माघार घेतील. मानवतावादी मदत तसेच पॅलेस्टिनी कैद्यांसाठी काही ओलीसांची देवाणघेवाण देखील होईल. या करारामुळे अखेरीस शत्रुत्व कायमचे बंद होईल आणि गाझासाठी एक मोठी पुनर्रचना योजना तयार होईल. युद्ध समाप्त करण्याचा हाच एकमेव योग्य मार्ग आहे, असे बायडेन यांनी म्हटले आहे.

मात्र सर्व ओलीस परत येईपर्यंत आणि हमासची लष्करी आणि सरकारी क्षमता नष्ट होईपर्यंत युद्ध संपणार नाही. असे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

वाटागाटींमध्ये मध्यस्थी करणाऱ्या कतार आणि इजिप्तनेही हमासच्या राजकीय नेतृत्वाकडे हा तडजोडीचा प्रस्ताव मान्य करण्याचा आग्रह धरला आहे. कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी आणि इजिप्शियन गुप्तचर विभागाचे प्रमुख मेजर जनरल अब्बास कामेल यांनी काल रात्री हमासचे राजकीय प्रमुख इस्माईल हनीयेह यांची भेट घेतली आणि शांतता करार स्वीकारण्याचा आग्रह धरला.

नवीन शांतता कराराचे स्वरुप…
इस्रायलच्या तीन टप्प्यातील युद्धविराम प्रस्तावात महिला, मुले, वृद्ध आणि जखमी अशा ओलीसांच्या सुटकेचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात रफाहसह गाझामधील दाट लोकवस्तीच्या प्रदेशातून इस्रायल सैन्याने माघार घ्यावी. सहा आठवड्यांचा युद्धबंदी कालावधी पाळण्यात यावा. या कालावधीत इस्रायल आणि हमासने दुसऱ्या टप्प्याबाबत वाटाघाटी कराव्यात.

या दुसऱ्या टप्प्यात कायम स्वरुपी युद्धबंदी लागू करण्यात यावी. उर्वरित सर्व ओलिसांची आणि इस्रायलच्या तुरुंगातील सुमारे ९०० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका व्हावी, असाही प्रस्ताव त्यात आहे. तर तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात गाझाची फेरउभारणी आणि उर्वरित सर्व कैदी, ओलिसांची सुटका करण्याचा प्रस्ताव आहे.