दिवाळीपूर्वी मोदी सरकारकडून तरुणांना मोठं गिफ्ट; सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्र देणार

नवी दिल्ली : दिवाळीपूर्वी मोदी सरकारकडून तरुणांना मोठं गिफ्ट आज दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील ५१ हजार तरुणांना सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र देणार आहे. आज दुपारी १ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे नियुक्तीपत्रक दिलं जाणार आहे. अर्थातच येत्या काही दिवसांवर दिवाळी येणार असल्याने त्यापूर्वी मिळालेल्या या सरकारी नोकरीच्या नियुक्तीपत्रामुळे निश्चितच तरूणांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळणार आहे.

नियुक्ती झालेल्या तरुणांना केंद्र सरकार तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विविध विभागांमध्ये नोकरी दिली जाणार आहे. वाढती बेरोजगारी लक्षात घेता केंद्र सरकारकडून आज देशातील ३७ ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. ७५० हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नियुक्त केल्या जाणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांना iGOT कर्मयोगी पोर्टलवर कर्मयोगी प्रारंभ या ऑनलाइन मॉड्यूलद्वारे स्वतःला प्रशिक्षण देण्याची संधी मिळणार आहे.

देशभरातून निवड झालेले नवनियुक्त कर्मचारी हे रेल्वे मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय यासारख्या सरकारच्या विविध विभागांतून आलेले आहेत. दरम्यान, लोकसभा २०२४ निवडणुकीपूर्वी देशातील १० लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानुसार आता या रोजगार मेळाव्या अंतर्गत मोदी सरकारकडून बेरोजगारांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली आहे.