मोठी बातमी! लहान मुलांना करोना लस नाहीच; NTAGI कडून लहान मुलांना लस देण्याबाबत ‘रेड सिग्नल’

नवी दिल्ली : करोनाच्या नव्या व्हेरियंटने संपूर्ण जगाला धडकी भरली आहे. जगातील अनेक देशांमध्ये या व्हेरियंटने एन्ट्री केली आहे. त्यातच ओमायक्रॉनने देशात शिरकाव केला आहे. त्यामुळे करोना लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यातच लहान मुलांसाठीच्या लसीची  डोस कधी दिले जातील, याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. कारण नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुपने लहान मुलांना लस देण्याबाबत कोणतीही शिफारस केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

करोना लसीकरणाला देशभरात वेग आला आहे. १८ वर्षावरील वयोगटातील सर्वांना करोना लस दिली जात आहे. एकीकडे शाळांची दार उघडी केली जात आहे पण अद्यापही लहान मुलांना करोना लस देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.


आज नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुपची महत्त्वाची बैठक पार पडली. आजच्या या बैठकीत मुलांसाठी अतिरिक्त कोविड डोस आणि लस याबाबत कोणतीही अंतिम शिफारस करण्यात आली नाही, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

दरम्यान, भारत बायोटेक कंपनीकडून लहान मुलांसाठीची लस तयार करण्यात आली आहे. 2 ते 18 या वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लस तयार आहे. या लसीच्या पहिल्या तीनही टप्प्यांच्या चाचण्या पार पडल्या असून शेवटची औपचारिकता बाकी आहे.मात्र लहान मुलांसाठीची ही लस असल्यामुळे कुठलाही धोका न पत्करता सर्व निकषांची वारंवार खातरजमा केल्यानंतरच या लसीला लहान मुलांवर वापर करण्यासाठी परवानगी देण्याचे  केंद्र सरकारचे धोरण आहे.

कोव्हॅक्सिनकडून या लसीबाबत सादर करण्यात आलेला डेटा तपासण्याचे आणि त्याचे  पृथक्करण करण्याचे काम सध्या सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर लशीच्या वापराला परवानगी मिळू शकणार आहे. पण याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.