मोठी बातमी ! डीसीजीआयकडून ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘कोवॅक्सिन’ला मंजूरी

नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा करोनाच्या संसर्गामंध्ये हळूहळू वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे देशात चौथी लाट येणार कि काय अशा चर्चाना पुन्हा एकदा उधाण येत आहे. त्यातच आता ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला प्रतिबंधित आपत्कालीन वापरासाठीची परवानगी देण्यात आली आहे.

आजच या लसीला परवानगी देण्यात आली आहे. या अगोदर पॅनेलने डिसेंबर २०२१ मध्ये १२ वर्षांवरील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी कोवॅक्सिनला मान्यता दिली होती. ६ ते १२ वयोगटातील मुलांचे लसीकरण करताना, कंपनीला पहिल्या दोन महिन्यांसाठी दर १५ दिवसांनी आणि त्यानंतर पाच महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला योग्य विश्लेषणासह डेटा सबमिट करण्यास सांगितले आहे. करोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर फारसा परिणाम झाला नाही, परंतु आता लहान मुले देखील कोरोनाचा नवीन प्रकार XE च्या कचाट्यात सापडत आहेत.

शाळा सुरू झाल्यानंतर या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची भीती आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गेल्या तीन आठवड्यांत मुलांमध्ये फ्लूसारखी लक्षणे वाढली आहेत. त्याचवेळी, मंजुरी मिळाल्यानंतर, सरकार लवकरच एक मार्गदर्शक तत्त्व जारी करणार असल्याचे म्हटले जात आहे. ज्यामध्ये हे लसीकरण देशात केव्हा आणि कसे सुरू करावे हे सांगितले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.