मोठी बातमी: उत्तरप्रदेशातील EVM हेराफेरीच्या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी निलंबित

लखनौ – उत्तरप्रदेशात एका अधिकाऱ्याने आयोगाची परवानगी न घेताच काही इलेक्‍ट्रॉनिक मतदार यंत्रे अन्यत्र हलवल्याने त्याविषयी समाजवादी पक्षाने अधिकृतपणे तक्रार केल्यानंतर त्या प्रकरणी वाराणसीचे अतिरीक्त जिल्हाधिकारी एन. के सिंह यांना निवडणूक आयोगाने निलंबीत केले आहे.

ही मतदान केंद्रे विना परवाना हलवण्यात आल्याचे वाराणसीच्या पोलिस आयुक्तांनी कालच मान्य केले होते. या घटनेच्या संबंधात वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितले की, या वोटिंग मशिन्स आज सकाळी हलवण्यात येणार होत्या. पण एन. के सिंह यांनी कोणाचीहीं परवानी न घेता या मशिन्स काल रात्रीच हलवल्या.

हा इलेक्‍ट्रानिक वोटिंग मशिन्स चोरून त्यात छेडछाड करण्याचाच प्रकार होता असा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे. तथापि निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की याद्वारे मतदानात फेरफार करण्याचा कोणताही प्रकार घडला नाही. ज्या मशिन्स हलवल्या गेल्या त्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिन्स होत्या असाही दावा काही अधिकाऱ्यांनी केला आहे.