मोठी बातमी..! रशिया -गोवा विमान उडवून देण्याची धमकी; २३८ प्रवाशांचा जीव धोक्यात

रशियाहून गोव्याला जाणाऱ्या अझूर एअरच्या चार्टर्ड फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळाल्यानंतर हे विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले आहे. हे विमान रशियाच्या पर्म विमानतळावरून गोव्याला जात होते.

विशेष म्हणजे या विमानात 238 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर्ससह 245 लोक होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, दाबोलिम विमानतळाच्या संचालकांना 12.30 वाजता फ्लाइटमध्ये कथित बॉम्ब असल्याचा ईमेल आला होता. त्यानंतर ते तातडीने वळवण्यात आले.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘हे विमान पहाटे ४.१५ वाजता दक्षिण गोव्यातील दाबोलिम विमानतळावर उतरणार होते. ते म्हणाले की, अझूर एअरचे (AZV 2463) उड्डाण भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वीच उझबेकिस्तानच्या दिशेने वळवण्यात आले होते.’

12 दिवसांत अशी दुसरी घटना
12 दिवसांत रशियाहून भारतात येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 10 जानेवारी रोजी रशियाची राजधानी मॉस्कोहून गोव्याला जात होती. तत्काळ कारवाई करत एटीसीने या विमानाचे गुजरातमधील जामनगर येथे इमर्जन्सी लँडिंग केले. मात्र, कसून शोध घेतल्यानंतरही विमानातून बॉम्ब सापडला नाही.