अजय देवगणच्या ‘दृश्यम’ची मोठी कामगिरी, ‘या’ भाषेत रिमेक होणारा बनला पहिला भारतीय चित्रपट

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिवर तुफान कमाई केली होती. त्यानंतर आता अजय देवगणच्या चित्रपटाचा कोरियन रिमेक बनणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये याची घोषणा करण्यात आली आहे.

कोरियन भाषेत भारतीय चित्रपटाचा रिमेक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘दृश्यम’ हा पहिला मल्याळम भाषेत 2013 मध्ये बनला होता, आतापर्यंत हा चित्रपट 7 भाषांमध्ये बनवला गेला आहे. त्यापैकी तीन परदेशी भाषांचाही समावेश आहे. आता तो 8व्यांदा कोरियन भाषेत बनवला जाणार आहे.

भारतीय प्रॉडक्शन हाऊस पॅनोरमा स्टुडिओ आणि दक्षिण कोरियाच्या अॅंथॉलॉजी स्टुडिओने भागीदारीची घोषणा केली आहे. यावेळी निर्माते कुमार मंगत पाठक उपस्थित होते. याबाबत कुमार मंगत पाठक म्हणाले की, “दृश्यम’चा रिमेक कोरियामध्ये बनत असल्याने मी आनंदी आहे. यामुळे हिंदी सिनेमाची जगभरात दखल घेतली जाईल. एवढी वर्षे आपण कोरिअन सिनेमे पाहूण प्रेरणा घेतली. भारतीय सिनेसृष्टीसाठी यापेक्षा मोठी अभिमानास्पद बाब काय असणार.”

‘दृश्यम’च्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन निशिकांत कामतने केले  आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि तब्बू मुख्य भूमिकेत होते. दृश्यम 2015 मध्ये हिंदीमध्ये आला होता. त्यात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता आणि ऋषभ चढ्ढा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट 38 कोटींमध्ये बनला होता आणि त्याने जगभरात 111 कोटींचा गल्ला जमवला होता. तर ‘दृश्यम’चा दुसरा भाग 2022 मध्ये रिलीज झाला होता.