मोठा धक्का ! भाजप खासदाराचा पुत्रच समाजवादी पक्षात दाखल

लखनौ – उत्तर प्रदेशात ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदार रिटा बहुगुणा जोशी यांचे पुत्र समाजवादी पक्षात सामील झाल्याची माहिती सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी दिली. ते आझमगडमधील रॅलीला संबोधित करत होते.

अखिलेश यादव म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार रिटा बहुगुणा जोशी यांचा मुलगा मयंक जोशी आज समाजवादी पक्षात सामील झाला आहे.

अखिलेश यादव पुढं म्हणाले की, जे गर्मी काढून टाकण्याची भाषा करत होते, ते सहाव्या टप्प्यांतच थंड झालेत. सहाव्या टप्प्यातच समाजवादी पक्षाने षटकार लगावला आहे. तसेच सहा टप्पे पूर्ण झाल्यानंतरही बाबा मुख्यमंत्र्यांना झोप लागत नसल्याची, टीका अखिलेश यांनी केली.


उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत हेमवती नंदन बहुगुणा यांचे नातू, मयंक जोशी यांनी अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत आझमगडमध्ये सपाचे सदस्यत्व स्वीकारले. तत्पूर्वी, शुक्रवारी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कोपगंज, मऊ येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले की, येथे आलेले हजारो तरुण योगी आदित्यनाथ यांना 10 तारखेला मठात परत पाठवतील.