जैवविविधतेची हानी या समस्यांवर एकत्रित उपाय हवे

मुंबई : जैवविविधता आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे परिणाम जागतिक स्तरावर स्पष्टपणे दिसत असून विकासाची गती कायम राखण्यासाठी तसेच लोककल्याण आणि समृद्धीला चालना देण्याच्या मार्गात महत्त्वपूर्ण अडथळे निर्माण करत आहेत. म्हणूनच संयुक्त आंतरराष्ट्रीय प्रयत्नांद्वारे हवामान बदल आणि जैवविविधतेची हानी या परस्परसंबंधित समस्यांवर जी 20 देशांनी एकत्रितपणे लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे. भारताचे जी 20 अध्यक्षपद सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृतीभिमुख धोरणाबद्दल वचनबद्ध आहे, असे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

जी 20 पर्यावरण आणि हवामान शाश्‍वतता कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे उद्‌घाटनपर भाषण झाले. समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेच्या भव्य यशाबद्दल तसेच ओशन 20 संवादमधील अर्थपूर्ण चर्चेबद्दल त्यांनी कार्यगटाचे अभिनंदन केले. ते म्हणाले की हा कार्यगट संकल्पना आधारित प्राधान्यक्रमांमध्ये अर्थपूर्ण परिणाम साधण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे आणि सर्वसहमतीने संप्रेषण तयार करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी ग्रामीण समुदायांना सहभागी करून घेण्याच्या महत्त्वाकडे लक्ष वेधून पाटील म्हणाले, शाश्‍वत विकास साधण्यासाठी आपण केवळ शहरी केंद्रांवरच नव्हे तर आपल्या ग्रामीण समुदायांचे कल्याण आणि प्रगतीकडेही लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.

पावसाचे बदलते स्वरूप, दुष्काळ आणि पाण्याची टंचाई, उष्णतेची लाट आणि वाढते तापमान आणि लहरी हवामानामुळे ग्रामीण समुदायांची उपजीविका, अन्न सुरक्षा आणि आरोग्यासमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत.

पृथ्वीच्या भविष्यासाठी
पृथ्वीचे सुरक्षित भविष्य सुनिश्‍चित करण्यासाठी सदस्य देशांमध्ये सहकार्य आवश्‍यक असल्याचे सांगून केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. भारताच्या जी 20 अध्यक्षपदाची संकल्पना विषद करताना ते म्हणाले, अशा आव्हानांना एकत्रितपणे तोंड देण्याच्या उद्देशाने, वसुधैव कुटुंबकम’ एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य, ही संकल्पना या गोष्टींना पुष्टी देते. पर्यावरण आणि हवामान शाश्‍वतता कार्यगटाने हाती घेतलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून यश मिळवण्यासाठी भारताला सहभागी देश आणि संघटनांकडून पाठिंब्याची अपेक्षा आहे, असे पाटील यांनी सांगितले.