सुट्टीतील पोषण आहारास बायोमेट्रिकचा अडथळा

नगर: टंचाईग्रस्त गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना सुट्टीत शालेय पोषण आहार पुरविण्याचा आदेश शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला पाठविला आहे. पोषण आहारातील बोगसगिरी रोखण्यासाठी विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्याच्या सूचनाही जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. प्रत्यक्षात एकाही शाळेत बायोमेट्रिक हजेरीची सोय नाही.

शासनाच्या नवीन धोरणामुळे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील अकरा तालुक्‍यांसह चार मंडलामधील गावे दुष्काळग्रस्त यादीत आहेत. दुष्काळी परिस्थितीत गावातील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा, यासाठी शिक्षण संचालकांनी नुकतेच आदेश काढले आहेत.त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दुष्काळग्रस्त भागातील किती गावांमध्ये पोषण आहार द्यावा लागेल, याचे प्रत्येक तालुक्‍यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण केले आहे. या गावांतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत उन्हाळ्यात दीड महिना पोषण आहार शाळेतच देण्यात येणार आहे.

शासनाने यावर्षीपासून नवीन बदल केला असून, विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेऊनच पोषण आहार देण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्ह्यातील किती शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी आहे, याची माहिती मागविली होती. यावर सर्वच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील एकाही शाळेत तशी व्यवस्थाच नसल्याचा धक्कादायक अहवाल दिला आहे. बायोमेट्रिक हजेरी नसल्यामुळे या गावांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे.

Leave a Comment