पुणे | चौकशी समितीच्या खातीरदारीसाठी “बिर्याणी’

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर आणि एकूणच रक्त नमुना बदल प्रकरणात सखोल चौकशीसाठी राज्य वैद्यकीय शिक्षण विभागाने तीन सदस्यीय समिती नेमली आहे. मंगळवारी (दि.२८) सकाळी ही समिती ससून रुग्णालयात दाखल झाली. मात्र, चौकशी राहिली बाजूला, समिती सदस्यांच्या खातीरदारीसाठी आणलेली बिर्याणीची चर्चाच जोरदार सुरू झाली. त्यामुळे ही चौकशी समिती का? “खादाड समिती’ असा प्रतिक्रिया उमटत आहेत.

तीन सदस्यांच्या समितीच्या अध्यक्षपदी मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या आयुक्तांमार्फत डॉ. सापळेंची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच या समितीमध्ये डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी यांचाही समावेश आहे. दरम्यान, समिती ससून रूग्णालयात दाखल होताच, आमदार रवींद्र धंगेकरही यावेळी अधिष्ठाताच्या कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे समितीसमोरच धंगेकर यांनी डाॅक्टरांसह ड्रग्स प्रकरणातील दोषींवरही कारवाईची मागणी केली.

त्यानंतर रात्री उशिरापर्यंत समितीच्या सदस्यांकडून चौकशी सुरू होती. त्यामध्ये प्रामुख्याने साइट व्हिजिटसह रक्त नमुन्यांमध्ये फेरफार झाला. त्यावेळी नेमके काय घडले, याची माहिती कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली.

या दिवशी आपत्कालीन विभागात कार्यरत असलेल्या परिचारिका, कर्मचारी, डॉक्टर, तंत्रज्ञ यांची चौकशी केली. त्यानंतर निवासी डॉक्टर, वैद्यकीय अधीक्षक यांची चौकशी केली. रक्तनमुना घेताना ससून रुग्णालयात नियमांचे पालन होते का? याची माहिती समिती सदस्यांनी घेतली.